पुणे 22 एप्रिल: कोरोनामुळे सगळीकडेच भीतीचं वातावरण निर्माण झालं. कोरोना झाला म्हणजे सगळं संपलं असाही गैरसमज लोकांमध्ये आहे. मात्र अनेक अनेक रुग्ण यातून ठणठणीत बरे झाले आहेत. पुण्यात मंगळवारी एकाच कुटुंबातल्या 15 लोकांना घरी सोडण्यात आलं. त्या सगळ्यांना लवळे येथील सिम्बॉयोसिस रुग्णालयात उपचारार्थ आयसोलेशनसाठी ठेवण्यात आले होते. पण डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे आम्हाला जिवदान मिळालं अशी भावना या लोकांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे या मंडळींमध्ये 3 वर्षांच्या मुलीपासून ते 92 वर्षांच्या आजींपर्यंत अशा तीन पिढ्यांचा समावेश होता.
या कुटुंबातल्या एका सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितलं की, सुरुवातीला आमच्या वडिलांना न्यूमोनिया झाला. नंतर आम्ही त्यांना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात नेले, पण कोणी दाखल करुन घेतले नाही. अखेर पुणे महानगरपालिकेच्या नायडू इस्पितळात नेले, मात्र त्यांनी ससून रुग्णालयात पाठविले, त्यांना कोरोनाची लागण झाल्याने स्वतंत्र वार्डात ठेवण्यात आले. व्हेंटीलेटरवर ठेवून उपचार करण्यात आले. परंतु न्युमोनिया आजार असल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.
पुन्हा आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. आमचे कुटुंब व नातेवाईक मिळून जवळपास 20 जणांना कोरोनाची बाधा झाली. सर्व जण घाबरलो, 20 पैकी 8 जण आम्ही एकाच कुटुबांतील होतो. आम्हाला लवळे येथील सिम्बॉयोसिस रुग्णालयात उपचारार्थ आयसोलेशनसाठी ठेवण्यात आले होते. खरं तर फार चिंतेत होतो, अख्खं कुटुंब कोरोनाबाधित झालं. पण सुदैवाने आम्ही बरे झालो.
Lockdown: महसूलमंत्री थोरातांच्या डॉक्टर कन्येने घरीच कापले वडिलांचे केस
या 15 दिवसात तणाव होता, परंतु डॉक्टर्स, नर्स आणि रुग्णालयातील सर्व सदस्य एवढ्या आपुलकीने वागत होते की, जणू काही आम्ही त्यांच्याच कुटुंबातील सदस्य आहोत. खूप आपुलकीची भावना निर्माण झाली या निमित्ताने नागरिकांना आम्ही असे आवाहन करतो की, घाबरु नका, पण काळजी घ्या. सर्दी, ताप, खोकला झाल्यास बिनधास्त दवाखान्यात जा, उपचार करुन घ्या. कोरोनाची लागण झाली तरी हिंमतीने सामोरे जा, आपल्यासाठी सर्व यंत्रणा राबते आहे. आपल्याला फक्त हिंमत द्यायची असते.
रेल्वे आली धावून, 5 वर्षांच्या चिमुरड्यासाठी पुण्यातून बेळगावला पोहोचवली मदत
सिंम्बायोसिस रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय नटराजन माहिती देताना म्हणाले, लवळे येथील सिंम्बायोसिस रुग्णालयात 155 रुग्ण दाखल आहेत. आज बरे होऊन घरी गेलेले 15 रुग्ण 8 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल झाले होते. 14 दिवस उपचारार्थ ठेवण्यात आल्यानंतर जेव्हा त्यांचे सॅम्पल निगेटिव्ह आले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसून येत होता. 92 वर्षाच्या आजीबरोबर त्यांच्याच कुटुंबातील 3 वर्षांची मुलगी व एक पोलिओग्रस्त रुग्णही होता.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने सिंम्बायोसिस रुग्णालय व भारती रुग्णालयाबरोबर करार केला असल्याची माहिती मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. भविष्यात रुग्ण वाढले तर तयारी असावी या हेतूने आमचे प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.