संगमनेर 21 एप्रिल: कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशात लॉकडाऊन आहे. 3 मे पर्यंत तो वाढविण्यात आला आहे. राज्यात 19 मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा अथवा इतर महत्वाची दुकाने वगळता सर्व काही बंद आहे. खेड्यांपासून ते बड्या शहरांपर्यंत सर्वांनाच याचा फटका बसला आहे. केशकर्तनालये, सलून, ब्युटीपार्लर देखील बंद आहेत. त्यामुळे केस कापायचे कुठे? दाढी करायची कुठे? असा प्रश्न सर्वसामान्य माणसांपासून ते सेलिब्रिटी, नेतेमंडळींसह अनेकांना पडला आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात सध्या गावी आपल्या घरी आहेत. घरीच त्यांच्या कन्येनं त्यांच्या केसांना आकार दिला.
बाहेर पडता येत नसल्याने त्यांची कॅन्सर तज्ज्ञ असलेली कन्या डॉ. जयश्री थोरात यांनी वडिलांचे केस घरीच कापले आणि त्यांचं ग्रुमींग केलं.
दरम्यान, मुंबई- पुणे भागात लॉकडाऊन असूनही रुग्णसंख्या कमी होत नाही. लोक निर्बंध नियम पाळत नसल्याचं लक्षात आल्यामुळे अपेक्षित लॉकडाऊन सवलती देता येणार नाहीत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी मुक्तपणे व्यवहार सुरू केल्याने शासनाने हा निर्णय घेतलेला आहे.
कोरोना विषाणूंचा वाढता फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठी लॉकडाऊन मध्ये आणलेली शिथिलता मुंबई- पुणे भागासाठी रद्द केली असून अधिक काटेकोरपणे लॉकडाऊन पाळले जावे असे प्रशासनाला निर्देश दिले आहेत. 20 एप्रिलपासून लॉकडाऊनच्या बाबतीत काही प्रमाणात शिथिलता आणण्याचे राज्य सरकारने ठरविल्यानंतर नागरिकांनी मुक्तपणे व्यवहार सुरू केले होते.
यावर मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना उद्देशून केलेल्या लाईव्ह प्रसारणातही नाराजी व्यक्त केली होती. तसेच निर्बंध न पाळल्यास शिथिलता रद्द केली जाईल असा इशाराही दिला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus