'महिना झाला, मुलाची भेट नाही; त्याच्या आठवणीने डोळे भरुन येतात'

'महिना झाला, मुलाची भेट नाही; त्याच्या आठवणीने डोळे भरुन येतात'

'त्याला फोन करायचे आम्ही टाळतो आणि व्हिडिओ कॉल तर शक्यतो नाहीच करीत. कारण, व्हिडिओ कॉल केला की त्याला पाहून रडू येत...'

  • Share this:

चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी

पुणे, 14 एप्रिल : देशात कोरोनाची साथ फैलावल्यापासून खरंतर शेकडो डॉक्टर्स, नर्सेसनी या महामारीत रूग्णांच्या सेवेत स्वत:ला झोकून दिलंय. पण त्यातही पुण्यातील भंवर दाम्पत्याचं योगदान इतरांपेक्षा वेगळं ठरतंय.  कारण, रूग्णांची सेवा करता यावी, यासाठी सुरेश आणि मिरा भंवर दाम्पत्याने स्वत:च्या 3 वर्षीय चिमुरड्यालाही गावी मावशीकडे पाटोद्याला पाठवून दिलं आहे.

सुरेश भंवर हे पुणे मनपाच्या नायडू संसर्ग हॉस्पिटलमधील आयसीयू विभागात परिचारक म्हणून कार्यरत आहेत. तर त्यांची पत्नी मीरा भंवर या पिंपरी चिंचवडमधील वायसीएम रूग्णालयातील आयसीयूत परिचारीका म्हणून रूजू आहेत. ही दोन्ही हॉस्पिटल्स सध्या कोरोना रूग्णांनी भरून गेली आहे.  याच रूग्णसेवेत  कोणताही खंड पडायला नको म्हणूनच भंवर दाम्पत्याने आपल्या चिमुरडल्याला गावी पाठवून दिलं आहे. खरंतर त्यांनी हा निर्णय ह्रदयावर दगड ठेऊन घेतला. कारण, पोटचा गोळा एवढे दिवस दूर ठेवणं किती यातनादायी असते हे इथं वेगळं सांगायला नको.

हेही वाचा - आधी देशाची सेवा मग आपलं लग्न! पोलीस नवरदेव आणि डॉक्टर नवरीने लग्नसोहळाच थांबवला

सुरेश भंवर सांगतात,  ‘ज्या दिवशी कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तेव्हाच लक्षात आले की, आपली लढाई आता सुरू झाली. त्याच दिवशी माझ्या तीन वर्षांच्या मुलाला गावी मामाकडे पाठवून दिले. मी आणि माझे पती आम्ही दोघेही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या सेवेत काम करीत आहोत. महिना उलटून गेला, मुलाची भेट नाही की, कोणता सण साजरा केला नाही. मुलाच्या आठवणीने डोळे भरुन येतात; पण कर्तव्य त्यापेक्षा अधिक मोठे वाटते.’ अशी भावना व्यक्त करताना परिचारिका मीरा सुरेश भवर यांचा गळा दाटून आला होता.

मीरा (वय 28) आणि त्यांचे पती सुरेश त्रिंबक भवर (वय 32) या दाम्पत्याने रुग्णसेवेचा एक वेगळा आदर्श प्रस्थापित केला आहे. मुळचे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथील भवर दाम्पत्य 2010 पासून पुण्यात राहात आहे. मीरा या पिंपरी-चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात परिचारिका आहेत. तर, सुरेश हे पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रोग रुग्णालयात परिचारक आहेत. सध्या हे दोघेही कोरोनाग्रस्तांसाठी उभारण्यात आलेल्या कक्षात नेमणुकीस आहेत. दोघांचाही कोरोनाग्रस्त रुग्णांशी निकटचा संपर्क येतो. रुग्णांचे मनोधैर्य वाढविणे, त्यांना वेळेत औषधे देणे, त्यांना हवे नको पाहणे, रुग्णांवर लक्ष ठेवणे, त्यांच्या प्रगतीचा अहवाल तयार करण्याचे काम हे दोघेही या कक्षांमध्ये करतात.

सुरेश भंवर यांनी लातूरच्या अहमदपूर येथून नर्सिंगचा कोर्स केला. त्यानंतर ते 2010 साली पुण्यात आले. त्यांनी सुरुवातीला खासगी रुग्णालयात काम केले. त्यानंतर त्यांनी 2014 साली पालिकेच्या आरोग्य विभागात नोकरी मिळाली. त्यांच्याच तालुक्यातील चुंबळी या गावच्या मीरा यांच्याशी त्यांचे लग्न झाले. त्यांनीही नर्सिंगचे प्रशिक्षण घेतलेले आहे. त्यांना कर्मधर्मसंयोगाने वायसीएम रुग्णालयात परिचारिकेची नोकरी मिळाली. सुरेश यांचा भाऊ रुबी हॉल रुग्णालयात लॅब असिस्टंट आहे, तर वहिनी सुद्धा परिचारिका आहेत. संपूर्ण भवर कुटुंब रुग्णसेवा करीत आहे.

हेही वाचा -मोदींनी लॉकडाउन वाढवताच राज्य सरकारचा नवा प्लॅन, अजितदादा अ‍ॅक्शन मोडमध्ये!

कोरोनामुळे सर्वत्र ‘लॉकडाउन’ असल्याने लोकांनी स्वत:ला घरात कोंडून घेतले आहे. आपण आणि आपला परिवार सुरक्षित राहावा याकरिता प्रत्येकजण काळजी घेत आहे. परंतु, स्वत:च्या कुटुंबाचा आणि वैयक्तिक सुखाचा विचार न करता हे ‘कोरोना वॉरियर्स’ अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्या दोघांना एकमेकांना वेळही देत येत नाही की नीट संवादही होत नाही. सामंजस्य, समजुदारपणा आणि एकमेकांच्या कर्तव्याची जाणीव ठेवत हे दाम्पत्य कोरोनाशी लढा देत आहे.

मुलाच्या आठवण काढताच मीरा भंवर यांना गहिवरुन आलं. 'कोरोनाचा पुण्यातील पहिला रुग्ण आढळल्यावर आम्हाला भविष्यातील परिस्थितीचा अंदाज आला होता. त्यामुळे मुलाला गावी पाठविले. त्याला फोन करायचे आम्ही टाळतो आणि व्हिडिओ कॉल तर शक्यतो नाहीच करीत. कारण, व्हिडिओ कॉल केला की त्याला पाहून रडू कोसळते. मग तो सुद्धा  ‘मला तिकडे घेऊन जा’ असे म्हटला की, काळजात कालवाकालव होते. गावाकडून आईवडील-सासू-सासरे, भाऊ बहिणी, नातेवाईक सतत फोन करुन काळजीने विचारपूस करीत असतात. सर्वजण आमचे मनोधैर्य वाढवितात', असंही दोघे म्हणाले.

 

"सर्व डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह आम्हीही वैयक्तिक सुखाला बाजूला ठेवले आहे. आम्ही कोरोनाला घाबरत नाही. रुग्ण बरे झाले पाहिजेत आणि देश जिंकला पाहिजे, हीच आम्हा सर्वांची भावना आहे. त्यामुळे नागरिकांनी महापालिका, पोलीस, प्रशासन आणि शासनाच्या निर्देशांचे पालन करावे. सोशल डिस्टन्सिंग राखावे. नागरिकांनी प्रामाणिकपणे शासनाच्या प्रयत्नांना साथ दिली तर कोरोनावर निश्चित विजय प्राप्त करता येईल"- मीरा आणि सुरेश भवर   

 

संपादन - सचिन साळवे

First published: April 14, 2020, 3:26 PM IST
Tags: mumbaipune

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading