पुणे, 16 फेब्रुवारी : सध्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरून राज्याचं राजकारण तापलं आहे. पोटनिवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून, आरोप -प्रत्यारोप सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र या सर्वांमध्ये चर्चा रंगली आहे ती म्हणजे अजूनही या पोटनिवडणुकीच्या प्रचारामध्ये भाजप नेते गिरीश बापट सक्रिय झालेले नाहीत. त्यामुळे गिरीश बापट हे नाराज आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता त्यांनी गिरीश बापट यांच्या नाराजीचं वृत्त फेटाळून लावलं आहे. काय म्हणाले बावनकुळे? चंद्रशेखर बावनकुळे यांनी गिरीश बापट यांच्यावर प्रतिक्रिया देताना ते नाराज नसल्याचं म्हटलं आहे. ‘गिरीश बापट नाराज नाहीत ते आमचे नेते आहेत. आता ते आजारी आहेत अशा अवस्थेत त्यांनी प्रचाराला यावं अशी तुमची इच्छा आहे का ? त्यांची कोणतीही नाराजी नाही, आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात आहोत. बापट यांनी सर्व कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे’, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. हेही वाचा : सुषमा अंधारेंच्या व्याख्यानावरून वाद पेटला, वारकरी पुन्हा पोलीस ठाण्यात राहुल कलाटेंवर प्रतिक्रिया दरम्यान त्यांनी यावेळी चिंचवड मतदारसंघातील शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. मतांचं विभाजन करण्यासाठीच भाजपकडून राहुल कलाटे यांना पाठबळ मिळत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आला होता. याला उत्तर देताना निवडणूक निकाल लागल्यानंतर समजेल असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.