पुणे, 11 फेब्रुवारी: पुण्यातील बिल्डर आणि हॉटेल व्यावसायिक अविनाश भोसले (Pune Builder Avinash Bhosale) यांच्या कार्यालयावर सक्तवसुली संचालनालयाने (ED) छापा टाकला होता. कारवाईदरम्यान अविनाश भोसले यांच्या मुलगा अमित भोसले (Amit Bhosle) यालाही रात्री ईडीने ताब्यात घेतले आहे. अमित भोसले याला ताब्यात घेतल्यानंतर ईडीचे पथक हे पुण्याहून मुंबईला रवाना झाले असल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी सकाळी साडे आठ वाजता सुरू झालेली चौकशी मध्यरात्रीपर्यंत सुरू होती. त्यानंतर ईडीचे पथक हे मुंबईकडे रवाना झाले. गेल्या अनेक दिवसांपासून अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी सुरू होती. ईडीने 6 वर्षांपूर्वीच्या परकीय चलनाशी संबंधित प्रकरणात ही कारवाई करण्यात आली होती. अविनाश भोसले हे पुण्यात मोठे बांधकाम व्यावसायिक असून ते हॉटेल व्यावसायिक देखील आहेत. दरम्यान FEMA कायद्यांतर्गत त्यांची चौकशी केली जात असल्याची माहिती मिळते आहे. याआधी नोव्हेंबर महिन्यात देखील ईडीने अविनाश भोसले यांना चौकशी केली होती. याशिवाय भोसले यांच्या पुणे आणि मुंबईतील एकूण 23 ठिकाणीही आयकर विभागाने छापा टाकला होता. 27 नोव्हेंबर 2020 रोजी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी करण्यात आलेली होती. राज्याचे सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्याशी अविनाश भोसले यांची मुलगी स्वप्नाली यांचे लग्न झाले आहे. अशी माहिती मिळते आहे की दोन आठवड्यांपूर्वी ईडीने स्वप्नाली यांना देखील या प्रकरणात नोटीस पाठविली होती. पण विश्वजित कदम यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. अविनाश भोसले आज कोट्यवधी रुपयांच्या एबीआयएल ग्रुपचे (ABIL Group) मालक आहेत. रिअल इस्टेट किंग अशी त्यांची पुण्यामध्ये ओळख आहे. अविनाथ भोसले यांच्या ओळखीतील लोक सांगतात की 80च्या दशकात ते रिक्षा चालवत असत. बांधकाम व्यवसायात आल्यानंतर सुरुवातीला कंत्राटदार ते आता पुण्यातील रिअल इस्टेट किंग अशी त्यांची ओळख आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.