पुणे, 07 सप्टेंबर: काल दुपारी पुण्यानजीक असणाऱ्या चाकण परिसरातील पीडब्ल्यूडीच्या मैदानात एका अल्पवयीन तरुणाचा मृतदेह आढळला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत या हत्येचं गूढ उलगडलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता, हत्येचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. मृत तरुणानं आरोपी तरुणाच्या बहिणीची छेड (young man tease sister) काढल्याच्या रागातून त्याची फिल्मी स्टाइल हत्या (Murder in chakan) करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
16 वर्षीय मृत तरुणानं आरोपी अराफत शिकीलकर याच्या बहिणीची छेड काढली होती. हा राग मनात धरून आरोपीनं संबंधित छेड काढणाऱ्या तरुणाचा डोक्यात लोखंडी रॉडनं वार करून निर्दयीपणे खून केला आहे. हत्येची घटना उघडकीस येताच चाकण परिसरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अराफत शिकीलकरसह युसुफ काकर, करण पाबळे, निहाल इनामदार, हुजेब काकर, सोहेल इमानदार आणि मन्सूर इनामदार अशा सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा-...म्हणून टोकाचं पाऊल उचललं, मला माफ करा; तलाठ्याकडून डॉक्टर पत्नीचा निर्घृण खून
हत्या कशी झाली?
आरोपी मन्सूरनं मृत अल्पवयीन तरुणाचं आपल्या दुचाकीवरून अपहरण केलं होतं. यानंतर आरोपी मन्सूरनं त्याला चाकण येथील मार्केट यार्डसमोर मोकळ्या मैदानात आणलं. याठिकाणी अराफत आणि त्याचे अन्य पाच मित्र आधीपासूनच उभे होते. तरुणाला याठिकाणी आणताच सर्वांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. हे प्रकरण केवळ एवढ्यावरच थांबलं नाही. तर आरोपी अराफतनं आपल्या हातातील लोखंडी रॉडने तरुणीच्या डोक्यावर जबरी प्रहार केला. तर आरोपी युसूफ काकर यानं दगडानं तरुणाचं डोकं ठेचलं. यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
हेही वाचा-लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीचं घर शोधलं अन्..; तरुणानं GFला दिला भयंकर मृत्यू
केवळ बहिणीची छेड काढली या कारणातून आरोपीनं आपल्या काही मित्रांच्या मदतीनं संबंधित तरुणाला भयंकर शिक्षा दिली आहे. काल दुपारी एका स्थानिक नागरिकाला हा मृतदेह दिसल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटना धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी युसूफ काकरला अटक केली आहे, तर अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.