दौंड, 29 एप्रिल : पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये काही दिवसांपूर्वी राजकीय वातावरण तापलं होतं. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दौंडमध्ये येत सभा घेतली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आमदार राहुल कूल यांच्यावर भीमा पाटस साखर कारखान्यात 500 कोटींचा घोटाळा केला, असा गंभीर आरोप केला होता. या आरोपांचा परिणाम दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत होईल असं वाटलं होतं. मात्र, भाजपचे आमदार राहुल कुल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकहाती सत्ता असलेल्या बाजार समितीमध्ये खिंडार पाडले आहे. भाजपकडून राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नऊ नऊ समान जागा मिळाल्यात. तीन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आणि वरवंडमध्ये सभा घेतल्यानंतरही मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला नाकारले. दौंड बाजार समितीमध्ये भाजपचे आमदार राहुल कुल यांनी वीस वर्षांपासून असलेल्या बाजार समिती मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकहाती सत्तेला खिंडार पाडले आहे. यावेळी राहुल कुल यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली असून कोण संजय राऊत असा पुन्हा उल्लेख केला आहे. वाचा - बीड जिल्ह्यात आघाडीचा युतीला दे धक्का! भावाचा बहिणीला तर काकाचा पुतण्याला छोबीपछाड राहुल कुल यांचं सूचक विधान? “माझ्याकडे हक्कभंग समिचीचं अध्यक्षपद आल्यानंतर संजय राऊत यांनी आरोप सुरू केलेत आहेत. हक्कभंग समितीची पहिली बैठक झाली आहे. दुसरी बैठक अध्यक्षांच्या कार्यवाहीनुसार होईल”, असं राहुल कुल म्हणाले. राहुल कुल यांनी या प्रतिक्रियेतून संजय राऊत यांच्याबद्दल सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आगामी काळात हक्कभंग समितीकडून संजय राऊत यांना दोषी ठरवलं जातं का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. हक्कभंग समितीने राऊतांना दोषी ठरवलं तर त्यांच्या अडचणी वाढू शकतात. “संजय राऊत म्हणतात की मी कोणाला घाबरत नाही. तसं मीही अनेकांना घाबरत नाही. मात्र संजय राऊत जर अशा पद्धतीने दबाव आणत असतील तर चुकीचं आहे. संजय राऊतांनी खूप उशीर केलाय. त्यांनी चौकशीची मागची केली आहे तर मी कोणत्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहे. 36 कोटी रुपयांचा हिशोब हा आम्ही 30 दिवसांतच दिला आहे”, असं राहुल कुल म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.