पुणे, 16 नोव्हेंबर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेल्या शाळा आता कुठे सुरू झाल्या. मात्र, शाळा सुरू होताच आता नवं संकट समोर आलं आहे. पुणे जिल्ह्यातील (Pune district) तब्बल 800 शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजबिल न भरल्यामुळे शाळांचा हा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. (Around 800 ZP Schools of Pune district electricity connection disconnected)
792 शाळांचे वीज कनेक्शन तोडले
वीज बिल न भरल्यामुळे पुणे जिल्ह्यातील 792 शाळांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. या सर्वच्या सर्व शाळा जिल्हा परिषदेच्या आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण 3 हजार 639 जिल्हा परिषद शाळा आहेत. त्यापैकी 2847 शाळांमध्ये वीजपुरवठा सुरळीत सुरू आहे. तर इतर शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
तब्बल 128 शाळांचे मीटर काढले
वीज बिल न भरल्यामुळे 792 शाळांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे तर 128 शाळांचे मीटरचं वीज वितरणने काढून टाकले आहेत. या घटनेमुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघातील 402 शाळांचा समावेश
सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघातील भोर, वेल्हा, मुळशी, बारामती, दौंड आणि इंदापूर या तालुक्यातील सुमारे 402 शाळांचा यामध्ये समावेश आहे.
वाचा : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासाकोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा सुरू
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता आणि त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच खबरदारी म्हणून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सरकारने शहरी भागातील 8 वी ते 12वी पर्यंतच्या तर ग्रामी भागातील 5 वी ते 12वी पर्यंतचे वर्ग भरवण्यास सुरुवात केली आहे. पुन्हा शाळांची घंटा वाजल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण असतानाच आता पुण्यातील जिल्हा परिषदांचे वीज कनेक्शन कापण्यात आल्याने नवी समस्या निर्माण झाली आहे.
इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी 12 नोव्हेंबरपासून अर्ज स्वीकारले जाणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेची आवेदनपत्रे शुक्रवार दि. 12 नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरावीत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
सदर परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. यामध्ये उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL डाटाबेसवरून नियमित शुल्कासह 12 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2021 या कालावधीत भरावयाची आहेत.
तर उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थी, आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांची आवेदनपत्रे प्रचलित पद्धतीप्रमाणे शुक्रवार दि. 3 डिसेंबर ते 11 डिसेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने भरावयाची आहेत. विलंब शुल्कासह हे अर्ज 13 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2021 या कालावधीत भरता येतील. तर, उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचा कालावधी 12 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर 2021 असा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.