पुणे, 14 मे: कोरोना (Coronavirus) विशेष बैठकीत आढावा घेण्यासाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे सकाळी साडेआठ वाजता विधान भवनात दाखल झाले नियोजित बैठकीला वेळ असल्याकारणाने अजित पवार यांनी राज्याला अक्षयतृतीया आणि ईद मुबारक च्या शुभेच्छा दिल्या ॲम्बुलन्सचे लोकार्पण केलं.
यावेळी अनेक संस्था मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्यासाठी चेक अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करत होते. या चेकची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे देऊन अजित पवार यांनी जिल्हाधिकार्यांना संबंधितांना पावती आणि आभार मानणारे पत्र देण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर अचानक एक अपंग कार्यकर्ता पुढे आला आणि त्यांनी अजित पवारांच्या हातांमध्ये चेक ठेवला. चेकवर नाव होतं पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या फाउंडेशनचं आणि मदत होती 2100 रूपयांची.
अजित पवार यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर निलेश लंके यांना हा चेक कसा पोहोचवता येईल, त्यांचे कुणी कार्यकर्ते पुण्यात असतील तर त्यांना निरोप देण्याच्या सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. या सूचना देताना त्यांनी चेकवरील नाव, दिनांक या सगळ्या गोष्टी बरोबर आहे का हे तपासून घेण्याच्याही सूचना दिल्या. दरम्यान त्यांच्या स्वीय सहायकांनी थेट निलेश लंके यांना फोन लावल्यानंतर अजित पवारांनी त्यांच्याशी बातचीत केली. त्यांनी निलेश लंकेंना असं म्हटलं की, 'तू सुरू केलेलं कोव्हिड सेंटरचं काम टीव्हीवर बघून अनेक जण तुला मदत करत आहेत. तुझं काम सुंदर चालू आहे. तुझं काम बघून आमच्या काही कार्यकर्त्यांना तुला मदत करायची आहे. 2100 रुपयांचा चेक दिलाय तो तुझ्याकडे पाठवतोय. असंच काम सुरू ठेवा.'
हे वाचा-लोकनेता हरपला; चिदंबरम यांना चप्पल फेकून मारणाऱ्या माजी आमदाराचं कोरोनानं निधन
आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी आधी कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी 1 हजार बेडचं कोविड सेंटर (Covid Center) उभारलं. इतकंच नाही तर ते व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे (Viral Photo of Nilesh Lanke) पुन्हा चर्चेत आले होते. फक्त सेंटर उभारुन ते थांबले नाहीत, तर रुग्णांच्या जेवणाची, उपचाराची आणि इतरही सर्व सुविधा त्यांनी याठिकाणी उपलब्ध करुन दिल्या आहेत. रुग्णांसाठी बेड उपलब्ध करुन देत लंके थांबले नाहीत. तर, रुग्णांची काळजी घेता यावी म्हणून त्यांनी कोविड सेंटरमध्येच मुक्काम ठोकला. हाच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होता.
हे वाचा-कोरोना कॉलर ट्यूनवरुन उच्च न्यायालयही भडकलं, कठोर टीका करत सरकारला फटकारलं
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये लंके अंगावर घेण्यासाठी चादर आणि डोक्याखाली घेण्यासाठी उशी नसतानाही सामान्य नागरिकांसोबत जमीनीवर झोपल्याचं दिसलं.
दरम्यान आढावा बैठकीत आज उच्च न्यायालयाने पुणे मनपाच्या कंट्रोल रूमला फोन केल्याप्रकरणी मोठी नाचक्की झाली, या प्रकरणाचाही खुलासा अजित पवार या बैठकीत विचारतील अशी माहिती मिळतेय
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, Corona, Coronavirus, Pune ajit pawar