मुंबई 12 मार्च : टाटा कॉन्सलटन्सी आणि प्रयास आरोग्य संस्था (Tata Consultancy Service (TCS) and Prayas Health Group) यांनी नुकताच एक सर्वेक्षण अहवाल सादर केला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहाता लॉकडाऊनची गरज आहे का? (Lockdown in Pune) हे तपासण्यासाकरता हे सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणानुसार, मागील वर्षीच्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत पुण्यातील कोरोना रुग्णसंख्या ६० टक्के राहाण्याची शक्यता आहे. तसंच सार्वजनिक आणि इतर ठिकाणचे निर्बंध कडक न केल्यास एप्रिलअखेरीस कोरोना रुग्णसंख्येचा सर्वोच्च शिखर बिंदू गाठण्याची शक्यता आहे. गंभीर बाब म्हणजे कडक निर्बंध लागू न केल्यास एप्रिल २०२१ च्या अखेरपर्यंत गंभीर रुग्णांची संख्या ४७ टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता आहे. तर निर्बंध लागू केल्यास मार्चच्या अखेरीस कोरोना रुग्णसंख्येचा शिखर बिंदू गाठून गंभीर रुग्णांचं प्रमाणही केवळ २९ टक्के येण्याची शक्यता या अहवालात वर्तवण्यात आली आहे. पुण्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार का याबाबतचा निर्णय आज म्हणजेच शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Pune guardian minister and deputy chief minister Ajit Pawar) घेणार आहेत. टीसीएस आणि प्रयासच्या तज्ज्ञांनी गेल्यावर्षी झालेल्या संसर्गाचे प्रमाण आणि आजच्या संसर्गाची टक्केवारी याची तुलना केली आहे. अनेक बाबींचा अभ्यास केल्यानंतर तज्ञांनी स्पष्ट केलं आहे, की यंदाची परिस्थिती गेल्यावर्षी इतकी वाईट होणार नाही. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये आलेल्या सर्वाधिक रुग्णसंख्येच्या तुलनेत यंदा ६० टक्क्यापेक्षा जास्त रुग्ण आढळणार नाहीत, असं पुणे जिल्ह्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी तज्ज्ञ आणि जिल्हा व नगरपालिका अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर सांगितलं आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी किमान पुढील दोन महिने शाळा आणि कॉलेज सुरू न करण्याचं या अहवालाातून सुचवलं गेलं आहे. बार, रेस्टॉरंट आणि हॉटेल यासारख्या ठिकाणीही कठोर निर्बंध घालण्याचं म्हटलं गेलं आहे, मात्र कशाप्रकारचे निर्बंध घातले जावेत, याबद्दल काही उल्लेख नाही. बार, रेस्टॉरंट किंवा इतर कोणत्याही ठिकाणी लोकं ३० मिनिटांपेक्षा अधिक वेळ बसून एकमेकांसोबत गप्पा गोष्टी करतात, अशा ठिकाणी कोरोनाचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता अधिक बळावते. त्यामुळे या गोष्टींवर निर्बंध घालणं गरजेचं असल्याचं यातून समोर आल्याचं सौरभ राव म्हणाले. या रिपोर्टनुसार, गार्डन आणि खेळाची मैदानं पुन्हा एकदा सुरु करण्यात आल्यानं याठिकाणांहूनदेखील प्रसार वाढण्याची शक्यता आहे. तसंच राजकीय मेळावे, लग्न समारंभ किंवा इतर सामाजिक कार्यक्रमांमध्ये कमी लोकांना उपस्थित राहाण्यास परवानगी द्यावी, असंही यात सुचवण्यात आलं आहे. सध्या यासाठी २०० लोकांच्या उपस्थितीस परवानगी आहे. शुक्रवारी याबाबत चर्चा होणार असून निर्णय घेण्यात येणार आहे. यासाठी खासदार आणि आमदारांनाही बैठकीसाठी बोलावलं गेलं असल्याचं सौरभ राव यांनी सांगितलं आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लॉकडाऊनची शक्यता नाकारली आहे. मात्र, नियम अधिक कडक केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.