कल्पना करा महासागरांचा संगम किती भव्य, अद्भूत आणि सुंदर दिसत असेल ना? कन्याकुमारी (kanyakumari) हे असेच एक ठिकाण आहे जिथे तीन महासागरांचा त्रिवेणी संगम पाहायला मिळतो. तामिळनाडूच्या (tamil nadu) दक्षिण किनार्यावर वसलेली कन्याकुमारी हिंद महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र यांचा त्रिवेणी संगम आहे. याव्यतिरिक्तही येथे अनेक अशी ठिकाणं आहेत, जिथं तुम्ही भेट द्यायला हवी.
तिरुक्कुरुलची रचना करणारे अमर तमिळ कवी तिरुवल्लुवर यांचा हा पुतळा पर्यटकांना खूप आकर्षित करतो. 38 फूट उंच चौथाऱ्यावर बांधलेली ही मूर्ती 95 फूट आहे. या पुतळ्याची एकूण उंची 133 फूट असून तिचे वजन 2000 टन आहे. ही मूर्ती साकारण्यासाठी एकूण 1283 दगडांचा वापर करण्यात आला होता. तसेच ही मूर्ती तिरुक्कुरलच्या 133 अध्यायांचे प्रतिनिधित्व करते आणि त्यांची तीन बोटे, म्हणजे अराम, पोरुल आणि इनबाम, नैतिकता, संपत्ती आणि प्रेम या तीन विषयांचा अर्थ दर्शवितात.
कन्याकुमारीपासून 20 किमी अंतरावर असलेले नगरकोलचे नागराज मंदिर नाग देवाला समर्पित आहे. भगवान विष्णू आणि महादेवाची आणखी दोन मंदिरे आहेत. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार चीनच्या बुद्ध विहाराच्या कारागिरीची आठवण करून देणारे आहे. जर तुम्ही कन्याकुमारीला भेट देण्याचा विचार करत असाल तर या मंदिराचा तुमच्या यादीत समावेश करा.
समुद्रात बांधलेल्या या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. स्वामी विवेकानंदांना आदरांजली वाहण्यासाठी विवेकानंद रॉक मेमोरियल कमिटीने 1970 मध्ये हे पवित्र स्थान बांधले होते. या ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी ध्यान केलं होतं. हे ठिकाण श्रीपाद पराई म्हणूनही ओळखले जाते. या स्मारकाचे विवेकानंद मंडपम आणि श्रीपाद मंडपम असे दोन प्रमुख भाग आहेत. प्राचीन मान्यतेनुसार या ठिकाणी कन्याकुमारीनेही तपश्चर्या केली होती. कुमारी देवीच्या पावलांचे ठसे आजही आहेत असे म्हणतात.
जर तुम्ही कन्याकुमारीला जात असाल तर तुम्ही अम्मान मंदिराला जरूर भेट द्या. हे मंदिर माता पार्वतीला समर्पित आहे. हे तीन महासागरांच्या संगमावर बांधले गेले आहे. इथे समुद्राच्या लाटांचा आवाज स्वर्गातील संगीतासारखा ऐकू येतो, अशी लोकांची धारणा आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी भक्त मंदिराच्या डावीकडे 500 मीटर अंतरावर असलेल्या त्रिवेणी संगमात स्नान करतात.