भारताचे माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झालं. ते गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. गुजरातमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दुर्राणी असे पहिले भारतीय क्रिकेटर होते ज्यांना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. १९६० मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार देण्यात आला होता.
भारताकडून सलीम दुर्राणी यांनी एकूण २९ कसोटी सामने खेळताना १२०२ धावा केल्या. यात त्यांनी १ शतक आणि ७ अर्धशतके केली. याशिवाय ७५ विकेटही घेतल्या होत्या.
सलीम दुर्राणी यांनी शेवटचा कसोटी सामना १९७३ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता आणि त्याच वर्षी निवृत्तीची घोषणा केली.
दुर्राणी यांनी चित्रपटसृष्टीतही नशीब अजमावलं होतं. सलीम यांनी चरित्र या चित्रपटात परवीन बॉबीसोबत काम केलं होतं.
अष्टपैलू क्रिकेटर सलीम दुर्राणी यांचा जन्म अफगाणिस्तानमध्ये ११ डिसेंबर १९३४ रोजी झाला होता. काबुलमध्ये जन्मलेले दुर्राणी फक्त ८ महिन्यांचे असताना कुटुंब पाकिस्तानमध्ये स्थलांतरित झाले. कराचीत राहत असताना भारत पाकिस्तान फाळणी झाली आणि त्यांचे कुटुंबिय भारतात आले.