भारताचा अनुभवी ऑफ स्पिनर आर.अश्विन मुंबई इंडियन्सचा लेग स्पिनर पियुष चावलाच्या सेन्स ऑफ ह्युमरचा दिवाना झाला आहे. अश्विनने पियुषसोबतच्या मजेदार चर्चेबाबत खुलासा केला आहे. पियुष चावला आयपीएल 2023 मध्ये त्याच्या उत्कृष्ट बॉलिंगमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. पियुष चावलाचा मुलगाही क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न बघत आहे, पण पियुषने त्याला आधीच धोक्याचा इशारा दिल्याचं अश्विनने सांगितलं.
पियुष चावला आयपीएल 2022 मध्ये खेळला नव्हता, कारण त्याला कोणत्याही टीमने विकत घेतलं नव्हतं. पण यंदाच्या लिलावात 34 वर्षांच्या या खेळाडूला मुंबईने 50 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं. पियुषने यंदाच्या मोसमात 10 मॅचमध्ये 17 विकेट घेऊन धमाकेदार कामगिरी केली आहे. पियुषच्या या कामगिरीमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. (Piyush Chawla/Instagram)
आर.अश्विनने त्याच्या युट्युब चॅनलवर पियुष चावलाबद्दलची मजेशीर गोष्ट सांगितली आहे. पियुष चावलाच्या सेन्स ऑफ ह्युमरची बरोबरी कोणी करू शकत नाही. मॅच सुरू व्हायच्या आधी मी त्याला विचारलं, तू कॉमेंट्री करत होतास, अचानक बॉलिंग करायला लागलास, या मोसमात मौज-मस्तीमध्ये विकेट घेत आहेस का? असं अश्विन म्हणाला. (Piyush Chawla/Instagram)
अश्विनच्या या प्रश्नाला पियुष चावलाने उत्तर दिलं. त्यांनी मला बोलावलं आणि बॉलिंग करायला सांगितली, मग मी टीममध्ये आलो. तुम्ही जेव्हा कॉमेंट्री करता तेव्हा तुमची बॉलिंग चांगली होते, असं पियुष अश्विनला म्हणाला. तसंच पियुष चावलाने त्याच्या मुलाला बॉलर न व्हायची ताकीदही दिली आहे. पियुष रोज त्याच्या मुलाला बॉलिंग करतो, ज्यामुळे मुलगा चांगला बॅटर होईल आणि भविष्यात आयपीएलचं कॉन्ट्रॅक्ट मिळवेल, असंही अश्विनने सांगितलं. (Piyush Chawla/Instagram)
आयपीएलमुळे पियुष चावला कुटुंबासोबत देशभर फिरत आहे. पियुषचा मुलगा हॉटेल रूमबाहेर इशान किशनला बॉलिंग करतानाचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने शेअर केला आहे. माझा मुलगाही क्रिकेटवर प्रेम करतो. कुटुंबातल्या सगळ्यांना तो टीव्हीसमोर बसवतो आणि मॅच बघायला लावतो, असं पियुष चावला म्हणाला. (Piyush Chawla/Instagram)
पियुषने मुलाला बॉलर व्हायचं स्वप्न बघू नकोस, असं सांगितलं आहे. त्याचा मुलगा 7 वर्षांचा आहे. मुलाने बॉलला हात लावला तरी पियुष त्याच्या हातावर मारतो, त्याच्या हातातून पियुष बॉल काढतो आणि बॅट देतो, असं अश्विनने सांगितलं. (Piyush Chawla/Instagram)
पियुषने मुंबई इंडियन्सना आपण धमाकेदार बॅटर तयार करत असल्याचं सांगितलं आहे, तसंच त्याच्यासाठी 20 कोटी रुपये तयार ठेवण्याचंही त्याने फ्रॅन्चायजीला सांगितलं आहे. 'मी मुलाला रोज सकाळी बॉलिंग टाकतो. मी बॉलर म्हणून खेळतोय तर ते मला फक्त 50 लाख रुपये देत आहेत. जर मुलाने चांगली बॅटिंग केली तर त्याला 10 वर्षांनी 20 कोटी रुपये नक्की मिळतील,' असं चावला अश्विनला म्हणाला. (Piyush Chawla/Instagram)