नाश्त्यामध्ये आपण आहारात फायबर, प्रोटिन्स आणि हेल्दी फॅट्सचे सेवन केले पाहिजे. मात्र हे करताना काही सावधगिरी बाळगणेदेखील आवश्यक आहे. झी न्यूज हिंदीने याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
ग्रेटर नोएडा GIMS हॉस्पिटलमधील प्रसिद्ध आहारतज्ज्ञ आयुषी यादव यांच्यानुसार, नाश्त्यामध्ये काही पदार्थ अजिबात खाऊ नये, अन्यथा आरोग्याला हानी पोहोचू शकते. चला तर जाणून घेऊया हे पदार्थ कोणते आहेत.
पांढरा ब्रेड : बरेच लोक सकाळी चहा, जॅम किंवा बटरसोबत व्हाईट ब्रेड खातात. त्यांना वाटते हा हलका नाश्ता आहे. मात्र व्हाईट ब्रेडमध्ये पोषक घटक कमी असतात आणि यामुळे पचनावरही परिणाम होतो. म्हणूनच व्हाईट ब्रेडऐवजी मल्टीग्रेन ब्रेडचा नाश्त्यात समावेश करावा.
कॉफी : सकाळी सर्वात आधी कॉफी पिण्याची बऱ्याच लोकांना सवय असते. यामुळे तुम्हाला फ्रेश वाटत असले तरी ते आरोग्यासाठी मुळीच चांगले नाही. रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो. पोट भरलेले कॉफी पिणे चांगले.
तृणधान्य : हल्ली नाश्त्यामध्ये तृणधान्य खाण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. परंतु ते प्रक्रिया करून तयार केले जात असल्याने ते आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामध्ये संपूर्ण धान्याचे प्रमाण खूपच कमी आणि साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
फ्लेवर्ड योगर्ट्स : नाश्त्यात दह्याऐवजी फ्लेवरचे दही खाणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. परंतु यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. म्हणूनच हे नाश्त्यात खाऊ नये.
पॅकेज्ड फ्रुट ज्युस : सकाळी फळांचा ज्युस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. मात्र पॅकेज्ड फ्रुट ज्युस पिऊ नये. कारण पॅक केलेल्या ज्यूसमध्ये प्रिझर्वेटिव्ह आणि साखर जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे आरोग्य बिघडू शकते.