रेल्वे प्रवास नेहमीच स्वस्त आणि सुलभ असतो. म्हणूनच देशातील बहुतेक लोक रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात. भारतातील बहुतांश ट्रेन या इलेक्ट्रिसिटीवर चालतात. पण, डिझेल इंजिन देखील अनेक मार्गांवर धावतात.
विजेवर चालणाऱ्या ट्रेनचा खर्च किती असतो तुम्हाला माहितीये का? ट्रेन 1 किलोमीटर धावली तर किती युनिट वीज वापरली जाते? तुमच्या हेही लक्षात आले असेल की, शहरात लाइट गेल्यावरही गाड्या कधीच थांबत नाहीत, असे का? याचं कारण आज आपण जाणून घेऊया.
सर्वप्रथम, इलेक्ट्रिक इंजिनवर चालणाऱ्या ट्रेनच्या मायलेजबद्दल बोलूया. इलेक्ट्रिक ट्रेनला 1 किलोमीटर धावण्यासाठी 20 युनिट्स खर्च होतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजमेर रेल्वे विभागात धावणाऱ्या इलेक्ट्रिक ट्रेन 20 युनिटमध्ये एक किलोमीटरचा प्रवास करत आहेत. विशेष म्हणजे डिझेल इंजिनपेक्षा इलेक्ट्रिक ट्रेन खूपच स्वस्त आहेत.
आता रेल्वेच्या वीज बिलाबद्दल बोलूया. तर रेल्वे प्रति युनिट विजेसाठी 6.50 रुपये भरते. अशा वेळी, 1 किलोमीटर चालत असताना 20 युनिट वीज वापरली, तर एकूण खर्च 130 रुपये येतो.
डिझेल इंजिनसह ट्रेन चालवण्यासाठी 3.5 ते 4 लिटर डिझेल खर्च होते. ज्याचा खर्च 350 ते 400 रुपये येतो. अशा परिस्थितीत डिझेलपेक्षा विजेवर गाड्या चालवणे स्वस्त आहे. यामुळेच रेल्वे झपाट्याने सर्वच मार्गांवर विद्युतीकरण करत आहे.
तुमच्या मनात एक प्रश्न असेल की अनेकदा वीज जाते, तरीही ट्रेन थांबत नाही. कारण रेल्वेला पॉवर ग्रिडमधून थेट वीज मिळते. त्यामुळे वीज कधीच जात नाही. पॉवर प्लांटमधून ग्रीडचा पुरवठा केला जातो, तेथून ते सबस्टेशनला पाठवले जाते. त्यामुळेच रेल्वे स्थानकाजवळ सबस्टेशन पाहायला मिळतात.