#StayHome: कोरोना काळात बँक संबंधित कामासाठीही घराबाहेर पडू नका! या ग्राहकांसाठी विशेष सेवा
बँकेच्या शाखेत जाण्यासाठी असमर्थ असणाऱ्या अनेक ग्राहकांसाठी विविध बँकांनी डोअर स्टेप बँकिंग सेवा (Door Step Banking Service) सुरू केली आहे. याअंतर्गत तुम्ही फायनान्शिअल आणि नॉन फायनान्शिअल कामं करू शकता.


काय आहे डोअर स्टेप बँकिंग सेवा? - या बँकिंग सेवेच्या माध्यमातून ग्राहक चेक जमा करणे, पैसे जमा करणे किंवा काढणे, जीवन प्रमाणपत्र मिळवणे यासांरख्या सुविधांचा लाभ घरबसल्या घेऊ शकता. ही सेवा 70 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग आणि अंध लोकांसाठी ही सेवा आहे. डोअर स्टेप बँकिंग अंतर्गत बँक कर्मचारी तुमच्या घरी येऊन आवश्यक कागद तुमच्याकडून घेईल आणि बँकेत जमा करेल. त्यानंतर तुम्हाला आवश्यक ती सेवा दिली जाईल.


डोअर स्टेप बँकिंग सुविधेअंतर्गत खातेधारकांना फायनान्शिअल आणि नॉन फायनान्शिअल सुविधा देण्यात येत आहेत. नॉन फायनान्शिअल मध्ये चेक, डिमांड ड्राफ्ट इ. मिळवणे, अकाउंट स्टेटमेंटची माहिती, नवीन चेक मिळवणे, टर्म डिपॉझिटची पावती मिळवणे, फॉर्म 16 सर्टिफिकेट, फॉर्म 15G/15H जमा करणे इ. बाबी समाविष्ट आहेत. तर फायनान्शिअल सर्व्हिसेस मध्ये पैसे जमा करणे आणि काढणे समाविष्ट आहे.


या सुविधेच्या नोंदणीकरता तुम्ही बँकेच्या मोबाइल अॅप्लिकेशन, वेबसाइट किंवा कॉल सेंटर इ. पर्यायांचा वापर करू शकता. या सुविधेचा लाभ घेण्याासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. ही सुविधा बँक शाखेपासून 5 किलोमीटर अंतरापर्यंत राहणाऱ्या ग्राहकांनाच मिळेल. शिवाय डोअर स्टेप बँकिंग सेवेचा लाभ घेण्यासाठी रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर SMS सुविधा सक्रीय करावी लागेल. या सुविधेसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मोबाइलवर त्याबाबत मेसेज पाठवला जाईल.


डोअर स्टेप बँकिंगमध्ये व्यवहाराची मर्यादा- जर तुमचे खाते यूनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) मध्ये आहे तर या सुविधेअंतर्गत पैसे काढण्याची आणि भरण्याची कमीत कमी रक्कम 5000 तर जास्तीत जास्त रक्कम 25000 रुपये आहे. तर तुम्ही SBI चे ग्राहक असाल तर तर मिनिमम लिमिट 1000 तर जास्तीत जास्त 20000 रुपये तुम्हाला काढता येतील. ही रक्कम काढण्याकरता संबंधित ग्राहकांकडे पर्याप्त बॅलन्स असणे गरजेचे आहे, नाहीतर ट्रान्झॅक्शन रद्द होईल.


डोअर स्टेप बँकिंगसाठी काय आहे शुल्क?- एसबीआयमध्ये फायनान्शिअल आणि नॉन फायनान्शिअल सर्व्हिसेससाठी प्रति व्हिजिट 75 रुपये+जीएसटी एवढे शुल्क घेतले जाते. तर यूनियन बँक ऑफ इंडियामध्ये हे शुल्क 200 रुपये+जीएसटी प्रति व्हिजिट आहे. पंजाब अँड सिंध बँकेत (Punjab & Sind Bank) प्रति व्हिजिट 50 रुपये+जीएसटी एवढे शुल्क घेतले जाते. तुम्हाला हे पैसे एजंटला द्यावे लागत नाही, तुमची रिक्वेस्ट पूर्ण झाल्यानंतर खात्यातून रक्कम वजा केली जाते.