गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. गौतमीने पाटील हे आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही, असा थेट इशारा मराठा समन्वयकचे राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी दिला आहे.
विरार मध्ये पहिल्यांदाच गौतमी पाटील यांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी गौतमी पाटीलने श्री सत्यनारायणाचे दर्शन घेतलं आणि पत्रकारांशी संवाद साधला.
महाराष्ट्रात कार्यक्रम होऊ देणार नाही याबद्दल बोलताना ती म्हणाली, 'माझं नाव पाटिल आहे मी पाटील नाव लावणार ना आता कोण काय बोलतोय मला फरक पडत नाही ...माझा कार्यक्रम सांस्कृतिक आहे.'
महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी गौतमीला पाहण्यासाठी तुफान गर्दी आणि चाहत्यांचा गोंधळ होतो. ती कायमच चर्चेत असते. गौतमीला फॉलो करणाऱ्यांची आणि कार्यक्रमांना गर्दी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
गौतमीची लावणी अश्लील असल्याचा आरोप करत तिला प्रचंड ट्रोल करण्यात येतं. पण असं असलं तरी तिच्या कार्यक्रमांची गर्दी काही कमी होत नाही. तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.