जळगाव, 18 नोव्हेंबर: पत्नी विरह सहन न झाल्यानं पतीनं फेसबुक लाईव्ह (Facebook live) करत धावत्या रेल्वेसमोर उडी घेत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रमोद तुकाराम शेटे (वय-32) असं मृत व्यक्तीचं नाव आहे.
'पत्नीचा मृत्यू झाला आहे, आता मी जगून काय उपयोग', अशा आशयाचा निरोप फेसबुक लाइव्हवर देत प्रमोदनं धावत्या रेल्वेखाली स्वत: ला झोकून देत आत्महत्या केली.
हेही वाचा...'नात्यामुळे लग्न करू शकलो नाही' म्हणत नवविवाहितेनं प्रियकरासोबत संपवलं आयुष्य
दीपावळीपूर्वी प्रमोदची पत्नी कांचन शेटे (वय-26) हिनं विष घेऊन आत्महत्या केली होती. प्रमोद आणि कांचनचं 5 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. आई-वडिलांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्यानं दोन चिमुकली मात्र पोरकी झाली आहेत.
मंगळवारी ही घटना शहरातील कांचन नगरात घडली. प्रमोद शेटे यांनं आत्महत्येपूर्वी धावत्या रेल्वेच्या दरवाज्यात उभं राहून फेसबूक लाईव्हवरुन एक व्हिडिओ शेअर केला होता. यावेळी प्रमोद भावनाविवश झाला होता. सासऱ्यांना त्यानं रामराम केला. यानंतर त्याने रेल्वेरुळाजवळ जाऊन फेसबुक लाइव्ह केलं. चेहरा न दाखवता त्याने आवाज ऐकवला आहे. लाइव्हमध्ये त्याने 'सर्वात आधी जन्म देणाऱ्या आईला, वडिलांना माझा नमस्कार, माझा दुसरा नमस्कार मला जन्म दिल्यानंतर सांभाळणारे आजी-बाबांना, माँ आणि आप्पा यांना. जन्मभर साथ देण्याची शपथ घेणारी मरण पावल्याने मी आता शेवटचे 2 मिनिटे बोलत आहे. शेवटचा गुडबाय करत आहे. मी तुम्हाला माझा चेहरा दाखवू शकत नाही. माझी पत्नी या जगात राहिली नाही, त्यामुळे मलाही जगण्यात इंटरेस्ट राहिला नाही', असा भावनिक संवाद प्रमोदने लाइव्हच्या माध्यमातून साधला आहे.
कांचन पलंगावर निपचित पडलेली होती...
प्रमोद यानं सोमवारी तर एका मित्रास व्हाइस मेसेज करून निरोप दिला. 'पत्नीचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे मी देखील आत्महत्या करतो आहे' असा संदेश त्याने दिला होता. हा संदेश पाहून सकाळी 7.30 वाजता प्रमोदचा मित्र त्याच्या सासुरवाडीत गेला. त्यानं संदेश ऐकवल्यानंतर कांचनची आई सुरेखा वाणी यांनी प्रमोदचे घर गाठलं. बाहेरून कडी-कोयंडा बंद होता. यावेळी पलंगावर कांचन निपचित पडलेली होती. तर दोन्ही मुली बाजूला झोपल्या होत्या. तर प्रमोद घरात नव्हता. कांचनला उठवण्याचा प्रयत्न केला असता ती बेशुद्ध असल्याचे निष्पन्न झाले. सुरेखा यांनी लहान मुलींना झोपेतून उठवले. 'पप्पांनी रात्री मम्मीला मारहाण केली होती', असं हिरननं आजीला सांगितलं. पतीनंच मुलीचा खून करून आत्महत्या केल्याचा आरोप कांचनच्या वडिलांनी केला आहे.
दारू, सट्टा खेळण्याचे व्यसन जडलं...
मिळालेली माहिती अशी की, प्रमोद याने पाच वर्षांपूर्वी कांचन हिच्यासोबत प्रेमविवाह केला होता. या दांपत्यास गिरीशा ( दीड वर्षे) व हिरन (वय-3 वर्षे) या दोन मुली आहेत. प्रमोदच्या आई-वडिलांचे 30 वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. तो कांचननरात आजी-आजोबांकडे राहत होता. याच परिसरात राहणाऱ्या कांचनसोबत प्रेमविवाह केल्यानंतर तो सासुरवाडीजवळच भाड्याने खोली घेऊन राहत होता.
हेही वाचा...बायकोनेच माझ्या खुनाची सुपारी दिली - भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप
प्रमोद हा एका मोबाइल कंपनीत काम करत होता. तर कांचन गृहिणी होती. दरम्यान, कांचनचे वडील राजेंद्र विश्वनाथ वाणी यांनी केलेल्या आरोपांनुसार, प्रमोद याला दारू, सट्टा खेळण्याचे व्यसन जडले होते. त्यामुळे तो सतत पत्नीसोबत भांडण व मारहाण करीत होता. व्यसनामुळे त्याच्यावर कर्ज झालं होतं. दरम्यान, प्रमोद यांचा मृतदेह पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात पाठवला असून, पुढील तपास सुरू आहे.