मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /Explainer : देशात अचानक का निर्माण झाला ऑक्सिजनचा तुटवडा? त्यावर उपाय काय?

Explainer : देशात अचानक का निर्माण झाला ऑक्सिजनचा तुटवडा? त्यावर उपाय काय?

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येत देशासमोर सर्वात मोठं संकट आहे ते ऑक्सिजन तुटवड्याचं.

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येत देशासमोर सर्वात मोठं संकट आहे ते ऑक्सिजन तुटवड्याचं.

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येत देशासमोर सर्वात मोठं संकट आहे ते ऑक्सिजन तुटवड्याचं.

    मुंबई, 19 एप्रिल : देशातलं कोरोना संसर्गाचं प्रमाण (Corona Pandemic) दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. त्यातच देशाल्या अनेक राज्यांमध्ये मेडिकल ऑक्सिजनची (Medical Oxygen) कमतरता भासू लागली आहे. हे ऑक्सिजन संकट तीव्र होत चाललं आहे. केंद्र सरकारने ऑक्सिजनची कमतरता असलेली आणि जिथली ऑक्सिजन कमतरता आणखी तीव्र होऊ शकते, अशी 12 राज्ये निश्चित करून त्या अनुषंगाने रणनीती आखायला सुरुवात केली आहे.

    महाराष्ट्रात (Maharashtra) मेडिकल ऑक्सिजनचा वापर पूर्ण क्षमतेने म्हणजे 1250टन एवढा होत आहे. महाराष्ट्रातल्या अॅक्टिव्ह कोरोनाबाधितांची (Active Corona Patients) संख्या सात लाख आहे. त्यापैकी 10 टक्के कोरोनाबाधितांना ऑक्सिजन थेरपीची (Oxygen Therapy) गरज भासते. ही गरज अन्य कोणत्याही राज्यापेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या ऑक्सिजनसह छत्तीसगड (Chhattisgarh) आणि गुजरात (Gujarat) या राज्यांतूनही 50-50 टन ऑक्सिजन मागवून महाराष्ट्राला वापरावा लागतो आहे.

    मध्यप्रदेशात रोज 250 टन ऑक्सिजनची गरज भासते आहे. मध्य प्रदेशात एकही ऑक्सिजन प्लांट (Oxygen Plant) नाही. त्यामुळे मध्य प्रदेशला छत्तीसगड, गुजरात आणि उत्तर प्रदेशवर ऑक्सिजनसाठी अवलंबून राहावं लागत आहे. दरम्यान ऑक्सिजन पुरवणाऱ्या या राज्यांतही आता कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागलीअसल्यामुळे मध्य प्रदेशच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. गुजरातलाही दररोज 500 टन ऑक्सिजन लागतो आहे.

    हे वाचा - संपूर्ण देशाला Remdesivir संकटातून बाहेर काढेल; सोलापूरच्या अशा कंपनीसमोरच अडचणी

    ग्रामीण भागांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. मात्र त्या भागांमध्ये ऑक्सिजन एकत्र करण्यासाठी मोठ्या टाक्या नाहीत. ग्रामीण भागांमध्ये छोटी हॉस्पिटल्स किंवा क्लिनिक आहेत आणि तिथे ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा दररोज केला जातो. त्यामुळे अगदी गरजेच्या वेळी ऑक्सिजनची कमतरता भासू शकते.

    रोज किती ऑक्सिजन तयार होतो?

    इंडियन एक्स्प्रेसने उद्योग क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या हवाल्याने प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तात म्हटलं आहे, की देशात दररोज सात हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होऊ शकते. आयनॉक्स ही सगळ्यात मोठी कंपनी असून ती रोज दोन हजार टन ऑक्सिजनची निर्मिती करू शकते. ही कंपनी सध्या निर्माण होत असलेला मेडिकल ऑक्सिजन देशभरातल्या विविध राज्यांत पाठवत असल्याचं या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. ऑक्सिजनचं उत्पादन वाढवण्यासाठी त्या कंपनीत नायट्रोजन गॅससारख्या अन्य काही वायूंचं उत्पादन तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आलं आहे. औद्योगिक ऑक्सिजनची निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्यांना कोरोना महासाथीदरम्यान मेडिकल ऑक्सिजन तयार करण्याची परवानगी देण्यात आली. आता तो निर्णय उपयुक्त ठरत आहे.

    पुरवठा कसा केला जातो?

    ऑक्सिजनची निर्मिती करणाऱ्या कंपन्या द्रवरूप अर्थात लिक्विड ऑक्सिजनची (Liquid Oxygen) निर्मिती करतात. त्याची शुद्धता 99.5 टक्के असते. हा ऑक्सिजन भव्य टँकर्समध्ये गोळा केला जातो. तिथून तो वेगवेगळ्या टँकर्समधून डिस्ट्रिब्युटर्सपर्यंत पोहोचवला जातो. त्याचं विशिष्ट तापमान राखलं जातं. डिस्ट्रिब्युटर्सच्या पातळीवर द्रवरूप ऑक्सिजनचं वायूत रूपांतर केलं जातं आणि तो छोट्या सिलिंडर्समध्ये भरला जातो. हे सिलिंडर्स रुग्णांच्या उपचारांसाठी वापरले जातात.

    समस्या कोणत्या?

    आपल्याकडे क्रायोजेनिक टँकर्सची संख्या पुरेशी नाही. क्रायोजेनिक टँकर्स (Crygenic Tankers) म्हणजे असे टँकर्स, ज्यात द्रवरूप ऑक्सिजन कमी तापमानात साठवला जातो. तसंच मेडिकल ऑक्सिजन ठिकठिकाणी पोहोचवण्यासाठी रस्तेही उत्तम स्थितीत नाहीत. जिथे ऑक्सिजन साठवण्याची सोय नाही, अशा ठिकाणी रुग्णांना ऑक्सिजनची गरज असेल, तर ऑक्सिजनची कमतरता जिवावर बेतू शकते. कारण अशा ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी वेळ लागतो.

    उपाय काय?

    1) इंडस्ट्रियल ऑक्सिजनवर बंदी

    अनेक उद्योगांनाहीऑक्सिजनचा सातत्यपूर्ण पुरवठा लागतो. दरम्यान कोरोना संकटाची तीव्रता वाढत असल्याचं पाहून केंद्र सरकारने तयार केलेल्या समितीने बहुतांश उद्योगांना लागणाऱ्या ऑक्सिजनच्या (Industrial Oxygen) पुरवठ्यावर सध्या बंदी आणली आहे. 22 एप्रिलपासून बहुतांश उद्योगांना ऑक्सिजन पुरवठा केला जाणार नाही. केवळ काही ठराविक अत्यावश्यक उद्योगांनाच ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे. जेवढ्या ऑक्सिजनची निर्मिती होईल, तेवढा सगळा ऑक्सिजन वैद्यकीय उपचारांसाठीच वापरता येऊ शकेल, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

    2) केंद्र सरकारने तयार केला एक गट

    यादरम्यान केंद्र सरकारने कोरोनासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणांची तपासणी आणि पुरवठ्यासाठी एक गट तयार केला आहे. एंपॉवर्ड ग्रुप टू (Empowered Group 2) असं या ग्रुपचं नाव असून कोरोना संसर्ग सर्वाधिक असलेल्या 12 राज्यांवर हा ग्रुप लक्ष ठेवून आहे. त्या राज्यांमध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, केरळ, तामिळनाडू, पंजाब आणि हरयाणा यांचा समावेश आहे. आगामी काळात या राज्यांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ज्या राज्यांकडे अतिरिक्त प्रमाणात ऑक्सिजन आहे, त्यांनी या 12 राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करावा, असं केंद्र सरकारने सांगितलं आहे. सुमारे 17 हजार टन ऑक्सिजन तीन टप्प्यांत या राज्यांना पुरवला जाऊ शकतो.

    हे वाचा - सावधान! कोरोनापासून बचाव करताना तुम्ही गंभीर आजाराला निमंत्रण तर देत नाहीयेत ना?

    ऑक्सिजनच्या कमतरतेचं संकट दूर करण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेला एम्पॉवर्ड ग्रुपटू हा गट वेगवेगळ्या प्रकारच्या डेटावर लक्ष केंद्रित करत आहे. साधारणतः 100 कोरोनाबाधितांपैकी 20 जणांना जास्त लक्षणं दिसतात आणि त्यातल्या सुमारे तीन जणांना ऑक्सिजनची गरज भासते. दूरवर, दुर्गम भागांत असलेली 100 हॉस्पिटल्स ओळखून या गटाकडून निश्चित केली जात आहेत. अशा ठिकाणी एक खास तऱ्हेचा ऑक्सिजन प्लांट उभारला जाईल. तिथे तयार झालेला ऑक्सिजन आजूबाजूच्या सगळ्या हॉस्पिटल्सना पुरवला जाऊ शकेल. त्यामुळे हॉस्पिटल्स ऑक्सिजनच्या बाबतीत आत्मनिर्भर होऊ शकतील. वाहतुकीचा खर्च आणि वेळ वाचेल. तसंच रुग्णांचे प्राण वाचवणं अधिक सोपं होऊ शकेल.

    या हॉस्पिटल्समध्ये भव्य ऑक्सिजन टँक्स तयार केल्या जात आहेत. 10 दिवसांची गरज भागेल एवढा ऑक्सिजन भरता येऊ शकेल, एवढी त्या टँक्सची क्षमता असेल. महासाथीच्या गेल्या वर्षीच्या काळात काही सरकारी हॉस्पिटल्समध्ये अशा प्रकारच्या टँक्स उभारण्यातही आल्या आहेत.

    First published:

    Tags: Corona, Coronavirus, Oxygen supply