नवी दिल्ली, 20 ऑगस्ट : देशातली अनेक गावं (Villages) त्यांच्या खास वैशिष्ट्यांमुळे ओळखली जातात. धार्मिक गोष्टी, शेतीपिकं, वेगळे प्रयोग, प्रकल्प आदी गोष्टींमुळे अनेक गावं प्रसिद्धीझोतात आल्याचं आपण पाहतो. काही गावं काहीशा हटके गोष्टींसाठीदेखील प्रसिद्ध आहेत. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूरमधील एक गाव अशाच खास गोष्टीसाठी ओळखलं जात. हे गाव जावयांमुळे (Son in law) प्रसिद्ध आहे. त्यामुळे या गावाचं नावदेखील दमादनपूरवा (Damadanpurwa) असं म्हणजे जावईपूर पडलं आहे. मराठीतच म्हणायचं झालं तर जावईपूर. या गावात सर्वाधिक घरं जावयांची आहेत. हे गाव कधी आणि कसं वसलं आणि त्याला दमादनपुरवा हे नाव का पडलं यामागे रंजक गोष्ट आहे. `आज तक`ने या विषयीची माहिती दिली आहे.
उत्तर प्रदेशातल्या कानपूरमधलं (Kanpur) एक गाव जावयांसाठी प्रसिद्ध आहे. दमादनपुरवा असं या गावाला संबोधलं जातं. या गावाची लोकसंख्या सुमारे 500 च्या आसपास आहे. या गावात 270 मतदार (Voter) आहेत. आता हे नाव पोस्टल पत्त्यावरही (Postal Address) नोंदवलं गेलं आहे. कानपूर ग्रामीण जिल्ह्यातील अकबरपूर तालुक्यात वसलेलं हे दमादनपुरवा गाव मुख्यालयापासून 10 किमी अंतरावर आहे. या गावातील बहुतांश घरं ही जावयांची आहेत. या गावात सुमारे 70 घरं असून त्यापैकी 40 हून अधिक घरं ही जावयांची आहेत. या भागात एकामागोमाग एक जावयांनी घरं बांधली. त्यामुळे आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी या वस्तीचं दमादनपुरवा असं नामकरण केलं. सरकारी दस्तावेजांमध्येही या नावाला मान्यता मिळाली. आता सरियापूर गावाचा हा एक भाग मानला जातो.
प्रियकराचा वाढदिवस प्रेयसीसाठी ठरला शेवटचा, आधी गळा चिरला, नंतर सांगितलं कारण...
या गावातले सर्वांत ज्येष्ठ जावई रामप्रसाद यांचं वय सुमारे 78 वर्ष आहे. सुमारे 45 वर्षांपूर्वी ते सासुरवाडीत स्थायिक झाले होते. सध्या नव्या जावयांपैकी अवधेश त्यांच्या पत्नीसोबत अलीकडेच या गावात स्थायिक झाले आहेत. आता तिसऱ्या पिढीतल्या जावयांनी येथे स्थायिक होण्यास सुरुवात केली आहे. जसवापूर गजनेर येथून सासरच्या घरी स्थायिक झालेले अंगनू आता हयात नाहीत. ते या गावाचे जावई होते. अंगून यांचा मुलगा रामदासाचा जावई अवधेश तीन वर्षांपूर्वी या गावात येऊन स्थायिक झाला आहे.
या गावात जावई स्थायिक होण्यामागे रंजक कहाणी आहे. या गावातल्या ज्येष्ठ नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ``1970 मध्ये सरियापूर गावच्या राणीचा विवाह जगम्मनपूर गावातल्या सांवरे कठेरियाशी झाला. त्यानंतर सांवरे सासुरवाडीतच स्थायिक झाले. जागा कमी पडू लागल्याने त्यांना गावाजवळील ओसाड जमीन देण्यात आली. ते आता हयात नाहीत, पण त्यांनी सुरू केलेली ही पद्धत अजूनही सुरूच आहे. त्यांच्यानंतर जुरैया घाटमपूरचे विश्वनाथ, झाबिया अकबरपूरचे भरोसे, अंडवा बरौरचे रामप्रसाद यांसारख्या लोकांनी सारियापूरमधील मुलींशी विवाह करून या ओसाड जमिनीवर घरं बांधली. 2005 पर्यंत येथे 40 जावयांनी घरं बांधली आणि ते स्थायिक झाले होते. ``
``लोक या भागाला दमादनपुरवा म्हणू लागले. पण सरकारी दस्तावेजांमध्ये या नावाचा समावेश झाला नव्हता. दोन वर्षानंतर या गावात शाळा (School) सुरू झाली आणि दस्तावेजांमध्ये दमादनपुरवाची नोंद झाली. दुसरीकडे ही परंपरा अशीच सुरू राहिली. जावई या भागात स्थायिक होत राहिले आणि या भागाची नोंद दमादनपुरवा या नावानेच झाली,`` असं या गावतले ज्येष्ठ नागरिक सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kanpur, School, Uttar pradesh, Village, Voters choice