पुण्यात 'डोंगरबाबा'चा उच्छाद; कोरोनाची भीती घालून पोखरला डोंगर

पुण्यात 'डोंगरबाबा'चा उच्छाद; कोरोनाची भीती घालून पोखरला डोंगर

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील आंबी या ठिकाणी बुवाबाजी (Superstition) फोफोवली आहे. येथील बुवाबाज दत्ता भगत (Datta Bhagat) यांने गावकऱ्यांना कोरोनाची भीती घालून डोंगर उद्धवस्त करायला सुरुवात केला आहे.

  • Share this:

हवेली, 17 मार्च: पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील आंबी या ठिकाणी बुवाबाजी (Superstition) फोफोवली आहे. येथील बुवाबाज दत्ता भगत (Datta Bhagat) याने गावकऱ्यांना कोरोनाची भीती घालून डोंगर उद्धवस्त करायला सुरुवात केला आहे. या परिसरात अनेक दुर्मिळ वनस्पती, पक्षी आणि प्राण्याचा अधिवास आहे. नैसर्गिक संपत्ती उद्धवस्त करण्यापासून बुवाबाज दत्ता भगत याला गावकऱ्यांनी थांबवू नये, म्हणून त्याने डोंगरावर होम हवन करत कोरोना पळवून लावतो, त्यामुळे गावातील कोणालाच कोरोना होणार नाही, अशी खोटी माहिती देऊन गावकऱ्यांना फसवलं आहे. हा बुवाबाज दत्ता भगत 'डोंगरबाबा' या नावाने परिसरात प्रसिद्ध आहे.

या डोंगरबाबाकडे पोलिसांनी आणि स्थानिक प्रशासनाने देखील दुर्लक्ष केलं आहे. पण गावातील काही नागरिकांनी याबाबतची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदिनी जाधव यांना दिली. त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे. आंबी परिसरात शेकडो वर्षापासून अनेक पशु-पक्षांचा अधिवास आहे. तसंच या परिसरात विविध वनस्पती असलेला डोंगर आहे. मात्र कोरोना काळात डोंगरावर होमहवन करुन डोंगरबाबा उर्फ दत्ता भगत याने जेसीबी आणि पोकलेनच्या मदतीने डोंगरांचं सपाटीकरण सुरू केलं आहे.

तसंच गावातील श्रद्धाळू लोकंही त्याच्या अंधश्रद्धेला बळी पडत आहेत. तर दुसरीकडे पोलीस प्रशासनही याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. त्याशिवाय कोरोना विषाणूचं निर्मूलन करण्याच्या नावाखाली डोंगरबाबाने गावकऱ्यांची आर्थिक फसवणूक करायलाही सुरुवात केली आहे.

(वाचा- आधी कुपोषण आता अंधश्रद्धेचा कळस, पोटफुगीमुळे चिमुकल्यांना दिले लोखंडी सळीचे चटके)

याबाबत अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या नंदिनी जाधव यांनी सांगितलं की, एखाद्या पोलीस स्टेशन हद्दीत जादूटोणा किंवा अंधश्रद्धासंबंधित घटना घडत असतील, तर पोलिसांनी कारवाई करणं अपेक्षित आहे. मात्र दरवेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीलाच पुढाकार घ्यावा लागतो. याप्रकरणी आम्ही पाठपुरावा करून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावू असंही जाधव यांनी यावेळी सांगितलं आहे. तसंच संबंधित डोंगरबाबा उर्फ दत्ता भगत याच्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी स्थानिक गावकऱ्यांनी केली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: March 17, 2021, 9:25 PM IST

ताज्या बातम्या