राष्ट्रवादीकडून तृतीयपंथी व्यक्तीची उपाध्यक्षपदी नेमणूक

राष्ट्रवादीकडून तृतीयपंथी व्यक्तीची उपाध्यक्षपदी नेमणूक

पुण्यात राष्ट्रवादीने चांदणी गोरे या तृतीयपंथी व्यक्तीची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे.

  • Share this:

पुणे, 3 मार्च : 'राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आगामी निवडणुकीत एकतरी तिकीट तृतीयपंथीय व्यक्तीला देऊ,' अशी घोषणा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर आता पुण्यात राष्ट्रवादीने चांदणी गोरे या तृतीयपंथी व्यक्तीची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे.

तृतीयपंथीय व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं पक्षातर्फे सांगण्यात आलं. साधारणत: 2 महिन्यांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी पुण्यातच तृतीयपंथी व्यक्तींना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सक्रिय राजकारणात उतरवण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आता ही नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या निर्णयाचे कौतुक केले आहे. निसर्ग कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात चांदणी गोरे यांनी पक्षाचे आभार मानताना अजित पवार यांना रोप भेट दिलं.

'तृतीयपंथीयांना हिजडे म्हणून हिणवण्याच्या राजकीय प्रवृत्तीचा समाचार घेत आगामी काळात संधी दिली तर तृतीय पंथी व्यक्ती राजकारणात कर्तृत्त्वाचा ठसा उमटवतील,' अशी आशा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.

काँग्रेसच्या सरचिटणीसपदीही तृतीयपंथी

काँग्रेसनेही काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या सरचिटणीसपदी तृतीयपंथीय कार्यकर्त्याची नियुक्ती केली. अप्सरा रेड्डी असं त्यांचं नाव असून त्यांनी तृतीयपंथीयांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काम केलं आहे.

नवी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि महिला काँग्रेसच्या प्रमुख सुश्मीता देव यांच्या उपस्थितीत ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. या नियुक्तीमुळे आता महिलांसाठी काम करण्याचं मोठं व्यासपीठ मिळाल्याची भावना अप्सरा रेड्डी यांनी व्यक्त केली होती.

कोण आहेत अप्सरा रेड्डी?

अप्सरा रेड्डी या तामिळनाडूच्या आहेत. लहान असताना जेव्हा त्यांना आपण वेगळे आहोत असं जाणवलं तेव्हा त्यांना कठीण प्रश्नांनांना तोंड द्यावं लागलं. पण या सर्व समस्यांचा मुकाबला करत त्यांनी स्वत:चं कतृत्व सिद्ध केलं. सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार म्हणून त्यांनी लहान मुलांवरच्या अत्याचाराची अनेक प्रकरणं बाहेर काढली.

कॉलेज जीवनापासूनच त्या सामाजिक कार्यात सक्रिय होत्या. जयललीता तामिळनाडूच्या मुख्यमंत्री असताना त्यांनी अप्सरा यांना पक्षाचं प्रवक्ते पद देऊ केलं होतं. पण कामाचं स्वातंत्र्य मिळणार नाही असं वाटल्याने त्यांनी ती ऑफर नाकारली.

काही वर्षांपूर्वी त्या भाजपमध्ये सामील झाल्या होत्या. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र महिनाभरातच त्यांनी भाजपला राम राम केला. भाजपमध्ये स्वतंत्रपणे विचार करायला मुभा नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.

VIDEO पंकजा मुंडेंनी केलं शरद पवारांचं कौतुक, म्हणाल्या पवारसाहेब 'या' अभिनेत्यासारखे

First published: March 4, 2019, 8:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading