Home /News /news /

निर्मलाताईंना दु:ख व्हावे हे...,राहुल गांधींवरील टीकेवरून शिवसेनेचा मोदी सरकारवर घणाघात

निर्मलाताईंना दु:ख व्हावे हे...,राहुल गांधींवरील टीकेवरून शिवसेनेचा मोदी सरकारवर घणाघात

'बाजूच्या देशांतील अल्पसंख्याक हिंदूंना पायघड्या घालणारी ही सरकारे आज बाजूच्या राज्यांतील आपल्याच बांधवांना स्वीकारायला तयार नाहीत. या अमानुष अस्पृश्यतेस काय म्हणावे?'

    मुंबई, 19 मे : 'काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे दिल्लीच्या रस्त्यांवर त्या मजुरांसोबत थांबले, थोडा वेळ बसले आणि बोलले. यावर निर्मलाताईंना अत्यंत दु:ख व्हावे हे आक्रितच म्हणावे लागेल. कुणी श्रमिकांचे दु:ख हलके करीत असेल तर सरकारला त्याचा आनंद व्हायला हवा, पण इथे उलटेच सुरू आहे.' असा सणसणीत टोला शिवसेनेनं मोदी सरकारला लगावला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकाच्या 'हे नवे कलियुग लॉक डाऊन : पर्व चार' आजच्या अग्रलेखातून अर्थमंत्र्यांनी राहुल गांधींवर यांच्यावर केलेल्या टीकाला उत्तर देत मोदी सरकारवर टीकेचा बाण सोडला आहे.  'मंत्री लॉकडाउन कुरवाळत बसले आहेत आणि मजूर लॉक डाऊन तोडून कच्च्या-बच्च्यांसह रस्ते तुडवत निघाले आहेत. त्या रस्त्यांवर विरोधी पक्षाचा एक नेता गांधी नावास जागून मजुरांना कवटाळत उभा राहिला याचे ज्यांना दु:ख होते त्यांनी यापुढे माणुसकी व परंपरेच्या गप्पा मारू नयेत' अशी टीकाही शिवसेनेनं या लेखातून केली आहे. ममतादीदींवरही टीका तसंच, 'महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांतून हे मजूर उत्तर प्रदेशात जायला निघाले तेव्हा त्यांना केंद्र सरकारने रोखले नाही. त्यांची व्यवस्था केली नाही. उत्तर प्रदेशच्या सीमेवर हे लाखो मजूर पोहोचले तेव्हा त्यांना तेथेच अडकवून ठेवले. उत्तर प्रदेशच्या सीमेत त्यांना येऊ देऊ नये, असे आदेश आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनीही महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि तामिळनाडू या चार राज्यांत अडकलेल्या कर्नाटकच्या मजुरांना आणि इतर नागरिकांना 31 मेपर्यंत कर्नाटकात प्रवेश मिळणार नाही असे स्पष्ट केले आहे. हेही वाचा - कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यात नवा शोध, रोबो करणार रुग्णांची प्राथमिक तपासणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही राज्या-राज्यांत अडकलेल्या बंगाली मजुरांना घेऊन येणाऱ्य़ा रेल्वेगाड्यांना आधी विरोधच केला होता. नंतर मात्र एक महिन्याच्या कालावधीत 105 रेल्वेगाड्यांना त्यांनी होकार दर्शवला. आपल्याच लोकांविषयी सरकारे असे कसे काय वागू शकतात? बाजूच्या देशांतील अल्पसंख्याक हिंदूंना पायघड्या घालणारी ही सरकारे आज बाजूच्या राज्यांतील आपल्याच बांधवांना स्वीकारायला तयार नाहीत. या अमानुष अस्पृश्यतेस काय म्हणावे?' असा परखड सवालही सेनेनं उपस्थितीत केला. 'उद्या भडका उडायला वेळ लागणार नाही' 'भुकेने बेजार झालेले लोक एकमेकांच्या हातातील अन्न-धान्य खेचून हाणामाऱ्य़ा करीत आहेत. जबलपूर रेल्वे स्थानकावर अशीच घटना घडली. बंगळुरू-हाजीपूर ही मजुरांना घेऊन जाणारी रेल्वे तेथे थांबली असता जेवणाचे पॅक वेळेवर न मिळाल्याने संतप्त झालेल्या मजुरांनी स्थानकावरील फूड स्टॉल, फूड व्हेण्डिंग मशीनची तोडफोड केली आणि तेथील अन्नपदार्थांची लूट केली. अशाप्रकारचा गोंधळ आज मर्यादित स्वरूपात दिसत असला तरी उद्या भडका उडायला वेळ लागणार नाही', अशी चिंताही या लेखातून व्यक्त करण्यात आली.  मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा धोक्याची घंटा 'कोरोनाची साखळी तोडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करूनही अपेक्षेप्रमाणे रुग्णवाढीचा वेग कमी होताना दिसत नाही. राज्यात कोरोनाबाधितांचा  आकडा 30 हजारांवर गेला. मुंबईत 20 हजारांच्या आसपास आहे. मुख्यमंत्री व त्यांचे सरकार कोरोनाशी झटापट करीत आहे, पण कोरोना वाढतोच आहे. भविष्यात राज्य सरकारांना बहुधा हेच एकमेव काम करावे लागेल असेच चित्र दिसत आहे. हेही वाचा - बापरे! सावधान...ऑगस्टपर्यंत भारतात कोरोना रुग्णांची संख्या जाऊ शकते 10 लाखांवर शैक्षणिक संस्था कधी उघडणार? कामगार कामावर कधी जाणार? (अर्थात नोकऱ्य़ा टिकल्या तर!) आकाशात विमाने कधी घिरट्या मारणार? रेल्वे रूळांवर लोकल्स कधी धडधडणार? बससेवा कधी सुरू होणार? मुंबईतील चित्रपटगृहांचा पडदा कधी बोलू लागणार? की आपण पुन्हा ‘मूकपटा’च्या जमान्यात किंवा जंगलयुगात जाणार? हे तूर्त तरी रहस्यच राहिले आहे. हे सर्व टप्प्याटप्प्याने चालू करायचा विचार करावा तर मुंबईतील 20 हजार कोरोनाग्रस्तांचा आकडा धोक्याची घंटा वाजवत आहे' अशी भीतीही सेनेनं व्यक्त केली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या