लक्ष्मण घाटोळ, (प्रतिनिधी)
नाशिक, 24 जुलै: कोरोनाच्या संकट काळात देवेंद्र फडणवीस आणि भाजपनं राजकारण करू नये, असा टोला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दिला आहे. नाशिक दौऱ्यावर आले असताना अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा शरद पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली. दरम्यान, आतापर्यंत दाखवला तसाच संयम मुस्लिम समाजाने बकरी ईदला दाखवावा, असं आवाहन पवारांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी पूर्णपणे कोरोनाच्या कामाला वाहून घेतल्याचं सांगत पवारांनी उद्धव ठाकरे यांचं कौतुक देखील केलं.
हेही वाचा... लालकृष्ण अडवाणींच्या रथाच्या 'सारथी'चा कोरोनानं मृत्यू, राष्ट्रवादीच्या नेत्यानं केली होती मदत
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आज (24 जुलै) नाशिक दौऱ्यावर होते. दुपारच्या सत्रात पवार यांनी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना कोरोना संदर्भातील बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पवार यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. शहरामध्ये रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बेड उपलब्ध करून देणे तसेच जास्तीत जास्त टेस्टिंग करणे महत्त्वाचे असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री कोरोनाच्या संकटात पूर्ण काम करत आहेत, असं सांगत पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक केलं. आम्ही फिल्डवर जाऊन परिस्थिती बघून त्याची माहिती मुख्यमंत्र्यांना देणार आहोत. त्यानंतर धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री घेत आहेत, असं देखील पवारांनी स्पष्ट केलं आहे.
नाशिकमध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठ असल्याने डॉक्टर्सची कमतरता भासणार नाही, मात्र जर डॉक्टर्स टाळाटाळ करत असतील. तर मात्र आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाईचा इशारा देखील पवार यांनी दिला. दरम्यान, लॉकडाऊनबाबत माझी काहीही भूमिका नाही. त्याबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेईल.
आरोग्याप्रमाणे आर्थिक संकट मोठं असून मुंबई उद्योगधंद्यात राहिलेली नाही. कामगार कोरोनाच्या भीतीने इतर राज्यात गेला पण तो आता परत येण्यासाठी उत्सुक आहे त्यामुळे परिस्थिती सामान्य करणे गरजेचे आहे असं देखील पवारांनी स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्रातील जनतेच आम्ही देणं लागतो..
फडणवीसांनी देखील या कामात लक्ष घालावे. राजकारण करू नये, असा टोला देखील शरद पवार यांनी लगावला.
साखळी ब्रेक करण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय आहे. मात्र, नाशिकमध्ये 15 ते 21 ऑगस्टपर्यंत उपलब्धता भरपूर आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय पालकमंत्र्यांवर सोपावलेला आहे. नाशिकमध्ये लगेच लॉकडाऊनची गरज नाही, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. दरम्यान रेमडिसिव्हर च्या सगळ्या ऑर्डर 3 कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. असं देखील राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, या बैठकीत बकरी ईद साधेपणाने साजरे करण्याचं आवाहन शरद पवार यांनी मुस्लिम बांधवांना केलं आहे. या बैठकीला भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी अनुपस्थित राहून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा...रिअल हिरोकडून मदतीचा ओघ सुरूच! सोनू सूद आता करणार त्या वॉरिअर आजीची मदत
लॉकडाऊनचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा..
राज्यात मुंबई, पुणे पाठोपाठ नाशिकमध्येही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. म्हणून जिथं रुग्ण जास्त आहे. तिथं आढावा घेत आहोत. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा वापर करण्याची वेळ डॉक्टरांनी येऊ देऊ नये. त्यांनी आपलं कर्तव्य बजवावं, असंही शरद पवार यांनी यावेळी सांगितलं. नाशिकमध्ये 7798 रुग्ण बरे झाले, ही जमेची बाजू असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. धारावीप्रमाणे मालेगावला प्लाझ्मा थेरपी सेंटर सुरू करण्यात येणार आहे.