मुंबई 3 जुलै: एका मोठ्या मालिकेतून बाहेर पडल्यानंतर सुद्धा अभिनेता किरण माने (Kiran Mane) कायमच चर्चेत असतो. किरण माने हा अभिनेता बिनधास्तपणे आपली मतं सोशल मीडियावर शेअर करत असतो. सध्याच्या राजकीय परिस्थीवर असो अनेक सामाजिक मुद्द्यांवर किरण माने स्प्ष्टपणे मत व्यक्त करताना दिसतो. सध्या त्याने एका जेष्ठ कलाकाराच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांची आठवण काढत एक खास पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेते सतीश तारे (Satish Tare) यांचा आज स्मृतिदिन आहे. 9 वर्षांपूर्वी सतीश तारे हे जग सोडून गेले आणि त्याने मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला. सतीश तारे यांचं विनोदाचं अफाट टायमिंग कायम परफेक्ट असायचं पण त्यांच्या एग्झिटचं टायमिंग मात्र चुकलं अशी हळहळ अनेकदा व्यक्त केली जाते. रंगभूमी, चित्रपट अशा प्रत्येक माध्यमात अप्रतिम काम करणारे हरहुन्नरी कलाकार म्हणून त्यांची ओळख होती. आज त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांची आठवण काढत किरण मानेने (Kiran Mane facebook) खास पोस्ट शेअर केली आहे.
तो असं म्हणतो, “…आमच्यातनं जाऊन तुला आज नऊ वर्ष झाली! नाटकात तू खाली पडल्यावर, शरीराची खत्त्तरनाक नागमोडी वळणं घेत वर उसळी मारायचास… टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. तशीच मागच्या वर्षीची ही पोस्ट ‘सर्रकन’ वर आलीय भावा…
तुला काय म्हणू गड्या? अष्टपैलू? हरहुन्नरी? गुणी?? अफलातून-कलंदर-अवलिया??? नाय नाय नाय नाय.. ही सग्ग्गळी विशेषणं फिकी पडतील इतका महान होतास तू ! पण बेफिकीर पणे जगलास आणि त्याच बेफिकीरीने गेलास. आम्हा सगळ्यांचं डोंगराएवढं नुकसान करून ठेवलंयस माहितीय का तुला…?
तू कधीच कुणाची नक्कल केली नाहीस. ‘स्वत:ची एक वेगळीच श्टाईल असलेला’ खराखुरा विनोद’वीर’ होतास तू… साध्या-साध्या वाक्यांच्याही विशिष्ठ उच्चारातून – बिनचूक शब्दफोडीतून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा तुझ्यासारखा अफाट नट मी आजवर पाहिला नाही. तुझी ‘आंगीक लवचिकता’ केवळ अ फ ला तू न ! नादखुळा !! जबराट !!!”
याशिवाय किरण सतीश यांच्या अभिनय शेळीपासून अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकताना दिसतो. सतीश तारे एक उत्तम नट, लेखक, दिग्दर्शक, गायक सुद्धा होते. कोणासारखं तरी होण्यापेक्षा त्यांनी स्वतःची शैली जपली आणि त्याचमुळे त्यांचं नाव आज सर्वदूर पसरलं आहे. अगदी चार्ली चॅप्लिन सारखी स्लॅपस्टिक कॉमेडी महाराष्ट्रातील एक अभिनेता करून गेला असं सुद्धा किरण या पोस्टमध्ये लिहितो.
हे ही वाचा- Sumeet Raghvan: ‘कारशेड वही बनेगा…’ सुमीत राघवनचा राज्य सरकारच्या निर्णयाला पाठिंबा!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Comedy actor, Death anniversary, Marathi entertainment