मुंबई, 23 ऑक्टोबर : दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्य गरिब जनतेला दिलासा मिळावा यासाठी मोठा गाजावाजा करत शिंदे सरकारने आनंदाचा शिधा वितरण सुरू केले आहे. पण आता हा आनंदाचा शिधा हा ऑफलाईन पद्धतीने वितरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील प्राधान्य कुटूंब व अंत्योदय अन्न योजनेतील पात्र सुमारे १ कोटी ६२ लाख शिधावाटप पत्रिका लाभार्थींमधील सुमारे ७ कोटी नागरिकांना दिवाळीनिमित्त वाटप करण्यात येणा-या आनंदाचा शिधा या शिधासंचाचे वितरण आजपासून ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता १ किलो साखर, १ किलो रवा, १ किलो चणाडाळ व १ लिटर पामतेल या चार वस्तू लवकरात लवकर मिळू शकतील अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी व पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. दिवाळीचा शिधा ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच पॉझ मशीनच्या माध्यमातून वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही व्यवस्था इंटरनेटच्या माध्यमातून सुरू होती. परंतु इंटरनेटच्या माध्यमातून सुरू असलेली ही व्यवस्था थोड्या संथगतीने सुरू असल्यामुळे आनंदाचा शिधा या शिधासंचाचे वाटप आता ऑफलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. त्यानुसार अन्न,नागरी व पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत Controller Rationing, मुंबई आणि सगळ्या DCS यांच्यासोबत तातडीची बैठक झाली. (CM च्या पक्षातील नेताच म्हणतो, ‘एकनाथ शिंदेंचा होणार रामदास आठवले’, शिवसेनेचा खुलासा) ‘दिवाळीच्या निमित्ताने शिधा जिन्नस उपलब्ध करणे ही प्राधान्याची बाब असल्याने लवकरात लवकर जास्तीत जास्त पात्र शिधापत्रिकाधारकांपर्यंत आनंदाचा शिधा पोहचविण्याच्या सूचना चव्हाण यांनी यावेळी दिल्या आहेत. तसेच सर्व लाभार्थी शिधापत्रिकाधारकांनी या ऑफलाईन वितरणाचा लाभ आपापल्या जवळच्या रेशनिंग दुकानात जाऊन घ्यावा, असं आवाहनही मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले आले. असा मिळणार आनंदाचा शिधा! ऑफलाईन पद्धतीने केलेल्या शिधा जिन्नस वाटपाची माहिती सेल रजिस्टरमध्ये प्रत्येक रास्त भाव दुकानदाराने नोंदवायची आहे. तसंच नोंद घेतांना लाभधारकाचे नाव, शिधापत्रिकेचे शेवटचे चार अंक, मोबाईल क्रमांक, दिलेल्या शिधा जीन्नासचा तपशील, प्राप्त रक्कम (१०० रुपये) आणि लाभधाराकाची सही ह्या बाबी नमूद करावयाच्या आहेत. काही जिल्ह्यात सगळे शिधाजिन्नस पुरवठाधारकाकडून उपलब्ध झाले नसल्याचे निदर्शनास आले. मात्र काही जिन्नस लाभधारकाला दुकानात उपलब्ध आहे असे दिसून आल्यावर जे उपलब्ध जिन्नस आहेत ते देण्यात यावे अशी मागणी होत आहे. या परिस्थितीत उपलब्ध जिन्नस लाभधारकाला देता येणार आहे. मात्र पुरवठादाराकडून सगळेच जिन्नस त्वरेने प्राप्त करवून घ्यावे, अशा सूचनाही मंत्री चव्हाण यांनी दिल्या आहेत. ( ‘…म्हणून भोसरी भूखंड प्रकरणाची पुन्हा सुनावणी’, एकनाथ खडसेंचा भाजपवर निशाणा ) ऑफलाईन पद्धतीचा वापर होत असल्याने लाभधारकास त्याचे जोडुन दिलेल्या दुकानातूनच शिधा जिन्नस वितरित करणे गरजेचे आहे. जिन्नस वाटप हा दुकानदाराकडून त्याच्या नेहमीच्या ओळख असणाऱ्या शिधाधारकाला होणार आहे. त्यामुळे लाभधारकाकडून मिळणारी रु. १०० ही सवलत रक्कम प्रथम टप्प्यात जमा करवून घ्यावी की संपूर्ण जिन्नस दिल्यावर, याबाबत दुकानस्तरावर निर्णय घेण्यात येईल. या वितरणाचा लेखाजोखा व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी दुकानदाराची असेल. तसेच उर्वरित जिन्नस प्राप्त झाल्यावर त्याची लाभधारकाकडून पोच घेण्याची जबाबदारी दुकानदाराची असेल या अटीवर उपलब्ध जिन्नस वितरीत करता येतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.