पुणे, 11 मे : जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाव्हायरसविरोधातील लस (coronavirus vaccine) विकसित करण्यात जुटलेत. काही ठिकाणी कोरोनाव्हायरसच्या लसीचं ह्युमन ट्रायलही सुरू झालं आहे. कोरोनाव्हायरसचा नाश करणारी ही लस येणार कधी, याची प्रतीक्षा प्रत्येकालाच आहे. मात्र किमान सहा महिने तरी कोरोनाव्हायरसची लस येणार नाही, त्यामुळे कोरोनाव्हायरससह जगायला शिकायला हवं, असं पुण्यातील तज्ज्ञांनी म्हटलं आहे. जगभरात कुठेही कोरोनाची लस यायला आणखी किमान सहा महिने लागणार, असं पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) कार्यकारी संचालक डॉ. राजीव ढेरे यांनी सांगितलं आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही रोगप्रतिकारक औषधं निर्माण करणारी कंपनी आहे. औषध निर्माण करणारी जगातली सर्वोत्तम संस्था म्हणून ओळखली जाते. अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी कोडाजेनिक्सच्या मदतीने सीरम इन्स्टिट्युटनेही कोरोनाव्हायरसविरोधातील लस विकसित केली आहे. हे वाचा - मुंबई, पुणे सोडून राज्यात या तीन ठिकाणी झाला कोरोनाचा उद्रेक, पाहा अपडेट या संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. राजीव ढेरे म्हणाले, “कोरोनाव्हायरसवरील लसीबाबत जगभरात आधी संशोधन आणि मग परीक्षण अशा दोन टप्प्यात काम सुरू आहे. अशी लस तयार करताना परिणामकारकरता निश्चित करण्यासाठी ठरलेला कालावधी जाऊच द्यावा लागेल” काय असते लसीची प्रक्रिया? तज्ज्ञां नी दिलेल्या माहितीनुसार, लस तयार होण्यात वर्षांपासून दशकापेक्षा जास्त कालावधी जाऊ शकतो. लस विकसित केली जाते. त्यानंतर त्याच्या ट्रायलसाठी आवश्यक डोस उत्पादित करावे लागतात. सुरुवातीला कमी लोकांवर टेस्ट केली त्यानंतर शेकडो लोकांवर दुसऱ्या टप्प्यातील टेस्ट आणि मग काही हजारों लोकांवर तिसऱ्या टप्प्यातील टेस्ट केली जाते. या प्रक्रियेनंतर सकारात्मक परिणाम आल्यानंतरच लसीच्या उत्पादनाला परवानगी दिली जाते. लस येईपर्यंत काय? कोरोनाव्हायरसवरील लस येईपर्यंत काय करायला हवं याबाबत डॉ. राजीव ढेरे यांनी मार्गदर्शन केलं आहे. “पुढचं एक वर्ष मास्क हा तुमच्या पेहरावाचा आणि सौंदर्याचा भाग बनवून घ्या. कोरोना विषाणूसोबतचा लढा वैयक्तिक स्तरावर लढण्यासाठी एक ते दीड मीटर अंतर ठेवा आणि नाका-तोंडाला हात लावण्यापूर्वी हात साबणाने धुवून घेतल्याचं सुनिश्चित करा. शिवाय ज्यांना रक्तदाब सारखे आजार आहेत त्यांनी जास्त घराबाहेर पडू नये”, असा सल्ला डॉ. ढेरे यांनी दिला आहे. संपादन - प्रिया लाड हे वाचा - रशियात 24 तासांत कोरोना रुग्णांमध्ये धक्कादायक वाढ; इटलीलाही टाकलं मागे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.