शेगाव, 18 नोव्हेंबर : महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी सावकरांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वाद उफाळला आहे. मनसेसह भाजपच्या अनेक नेत्यांकडून राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला जात होता. दरम्यान आज शेगावमध्ये त्यांच्या जोडो भारत यात्रेचं शेवटचं भाषण होतं. यावेळी ते सावरकरांबद्दल काही बोलणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. दरम्यान यावेळी त्यांनी सावरकरांबद्दल काहीही बोलणं टाळलं आहे. त्यांनी आपल्या भाषणात सावरकरांचा उल्लेख केलेला नाही. मात्र यंदा त्यांनी आपल्या भाषणात शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. काय म्हणाले राहुल गांधी? शिवाजी महाराजांबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले की, शिवाजी महाराजांनी केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर जगाला रस्ता दाखवला. ते शिवाजी महाराज बनले यामागे त्यांच्या आई जिजामातांचा मोठा हात आहे. त्यांनी शिवाजी महाराजांना घडवलं. त्यामुळे आज आपण त्यांचीही आठवण काढणे आवश्यक आहे. भाजप, मनसे आक्रमक झाल्याने राहुल गांधी नरमले? शेगावच्या सभेत सावरकरांवर बोलणं टाळलं राहुल गांधी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे राहुल गांधी म्हणाले की, 70 दिवसांआधी ही यात्रा कन्याकुमारीपासून सुरु झाली. समुद्रकिनारी यात्रेला सुरुवात झाली. प्रत्येक दिवशी 25 किलोमीटर ही यात्रा चालते. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगाणा, आंध्र आणि आता महाराष्ट्रात ही यात्रा आली. विरोधकांनी सवाल केला होता की, यात्रेची गरज काय? काय फायदा आहे?
देशात आज भाजपनं हिंसा, द्वेश आणि दहशत पसरवली आहे. या दहशत, द्वेष आणि हिंसेच्या विरोधात ही यात्रा सुरु केली. या यात्रेचं ध्येय कुणाला काही समजवायचं नाही. या यात्रेचा उद्देश आपला आवाज, आपलं दु:ख समजून घेण्याचा आहे, असं काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी आज शेगावमध्ये आयोजित सभेमध्ये बोलत होते.