शेगाव, 18 नोव्हेंबर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शेगाव येथे त्यांनी आज जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, विद्यार्थ्यांचे प्रश्न यावरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं. या यात्रेचा उद्देश आपला आवाज, आपलं दु:ख समजून घेण्याचा आहे, असं काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. यावेळी राहुल गांधी सावरकर यांच्यावर बोलतील असं सर्वांना वाटलं होतं. मात्र, त्यांनी सावरकरांवर बोलणं टाळल्याचं पाहायला मिळालं. राहुल गांधी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे राहुल गांधी म्हणाले की, 70 दिवसांआधी ही यात्रा कन्याकुमारीपासून सुरु झाली. समुद्रकिनारी यात्रेला सुरुवात झाली. प्रत्येक दिवशी 25 किलोमीटर ही यात्रा चालते. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगाणा, आंध्र आणि आता महाराष्ट्रात ही यात्रा आली. विरोधकांनी सवाल केला होता की, यात्रेची गरज काय? काय फायदा आहे? देशात आज भाजपनं हिंसा, द्वेश आणि दहशत पसरवली आहे. या दहशत, द्वेष आणि हिंसेच्या विरोधात ही यात्रा सुरु केली. या यात्रेचं ध्येय कुणाला काही समजवायचं नाही. या यात्रेचा उद्देश आपला आवाज, आपलं दु:ख समजून घेण्याचा आहे, असं काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी आज शेगावमध्ये आयोजित सभेमध्ये बोलत होते. वाचा - सावरकरांचा मुद्दा राहुल गांधींसाठी हिट विकेट की गेम चेंजर? थोड्याच वेळात ठरणार भवितव्य राहुल गांधी म्हणाले की, भीती, हिंसा, द्वेषानं तोडलं जातं तर प्रेमानं सर्व जोडलं जातं. भारत जोडोचं ध्येय हे ‘मन की बात’ करण्यासाठी नाही, असा टोलाही राहुल गांधींनी लगावला. हिंसा आणि द्वेषानं देशाला कधीच फायदा होणार नाही. राहुल गांधींनी म्हटलं की, ही भूमी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांची आहे. जगाला दिशा देणाऱ्या शिवरायांची ही भूमी आहे. इथे विदर्भातील शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय. विम्याचे पैसे भरुन देखील शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत. मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नाही. काही उद्योगपतींचं मात्र हजारो कोटींचं कर्ज माफ केलं जातं, दोन-तीन उद्योगपती देशाचं कर्ज बुडवत आहेत, असा आरोपही राहुल गांधींनी केला.
मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना राहुल गांधीचे आवाहन मुलं लाखो रुपए खर्च करुन शिक्षण घेतात. तरीही त्यांना रोजगार मिळत नाही, तरुणांना रोजगार नसलेला भारत आम्हाला नको आहे, असंही ते म्हणाले. हजारो शेतकरी आत्महत्या करत असूनही त्यांना कुठलीच मदत मिळत नाही. कुठलाही शेतकरी सांगेल योग्य दर मिळत नाही. काही हजारांच्या कर्जासाठी शेतकरी जीव देतायेत. मात्र, उद्योगपतींचं हजारो कोटींचं कर्ज कसं माफ होतं? मुलांच्या शिक्षणासाठी पालक लाखो रुपये खर्च करत आहेत, तरी तरुणांना रोजगार मिळत नाही. दोनतीन उद्योगपती देशाची संपत्ती बुडवतायेत. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घ्याव्यात, असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं.