अशोक मांढरे, प्रतिनिधी ठाणे, 4 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर महाविकास आघाडीतील मित्र पक्ष काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रवादीची भाजपसोबत बोलणी सुरू असल्याचं म्हटलं आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस नेते नाना पटोले आणि ठाकरे गटाच्या खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दोन्ही नेत्यांवर टीका केली आहे. कोणी कोणाच्या पक्षात लक्ष घालण्यापेक्षा स्वतःच्या पक्षात लक्ष द्यावे, असा टोला मिटकरी यांनी लगावला आहे. काय म्हणाले अमोल मिटकरी? शरद पवार राज्यभर फिरले होते म्हणुन 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या जास्त जागा निवडून आल्या होत्या. अनेक काँग्रेसचे आमदार बोलतात पवार साहेब आले म्हणुन आम्ही आमदार झालोय. राष्ट्रवादीत काय सुरू आहे हा आमचा प्रश्न आहे. काँग्रेसने त्यात लक्ष घालू नये त्यांनी त्यांचे चिंतन करावे, अशी टीका मिटकरी यांनी केली. राष्ट्रवादीत काय सुरू आहे, यांत संजय राऊत आणि काँग्रेसने लक्ष घालू नये, त्यांची त्यांचे दुकान पहावे. आमची भुमिका स्पष्ट आहे. आम्ही भाजपा विरुद्ध लढणार आहोत. मविआ म्हणुन लढणार आहोत. माझ्या पक्षात पातळी सोडून कोणी बोलत नाही. आमच्यामुळे मविआत कुठेही फुट पडणार नाही. प्रत्येक पक्षाने आंचार संहिता पाळावी, असंही मिटकरी म्हणाले. वाचा - कार्यकर्त्यांसमोर पवारांनी केली चूक मान्य! म्हणाले ‘तुमच्या मनासारखा निर्णय..’ पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्त्याचे मी समर्थन करत नाही. ते बोलले म्हणजे अख्खा प्रश्न होत नाही. पक्षाविरोधीत बोलत असतील तर आम्हाला बोलावे लागेल. आम्हाला घरात डोकावायला लावू नका, नाहीतर फार मोठं वेगळच वळण लागेल. काँग्रेसवा विनंती आहे की त्यांनी आघाडीत बिघाडी करु नये. कोणी आवरत नसेल तर त्यांना उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहेत, असा थेट इशाराच अमोल मिटकरी यांनी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.