मनसेचे नेते संजय राऊतांवर संतापले, राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर दिलं चोख प्रत्युत्तर

मनसेचे नेते संजय राऊतांवर संतापले, राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर दिलं चोख प्रत्युत्तर

मनसेप्रमुखांवर झालेल्या टीकेनंतर पक्षाचे नेते आता मैदानात उतरले आहेत.

  • Share this:

मुंबई, 25 एप्रिल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाईन शॉप सुरू करण्याबाबत केलेल्या मागणीवरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून आक्रमक शब्दांमध्ये टीका करण्यात आली. मनसेप्रमुखांवर झालेल्या टीकेनंतर पक्षाचे नेते आता मैदानात उतरले आहेत. मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी एक पोस्ट लिहून संजय राऊत यांचा खरमरीत शब्दांत समाचार घेतला आहे.

'बोलबच्चनचा हॅगओव्हर! मैं किस पथ से जाऊँ ? असमंजस हैं भोलाभाला...खूप दिवस झाले... हल्ली कुणीच विचारत नाही मला !!!! ‘मधुशाला’ मधली ही ओळ खास बोल बच्चन राऊतसाठी. नागू सयाजी वाडीत बसून शब्दांचे बुडबुडे काढणारे संजय राऊत हे सध्या आपल्याकडे कुणीच लक्ष देत नाही या भावनेने पछाडलेले दिसतात. अन्यथा राजसाहेबांनी केलेली सूचना त्यांच्या कार्यकारी टाळक्यात शिरली असती,' असा हल्लाबोल अमेय खोपकर यांनी केला आहे.

नक्की काय म्हणाले अमेय खोपकर?

"वेळ काय आणि यांचं चाललंय काय? डाईन, वाईन वगैरे शब्दांचे खेळ करत लॉकडाऊनमध्ये वेळ बरा जाण्यापलीकडे फार काही निष्पन्न होणार नाही. राजसाहेबांनी जी सूचना केली ती ताकाला जाऊन भांडे न लपवता केली आहे. सरकारी तिजोरीत खडखडाट असताना आता नैतिकतेच्या मायाजालात न अडकता वैधानिक मार्गाने काही उपाय अवलंबण्याची आवश्यकता आहे. त्यात तळी उचलून धरण्याचा प्रश्न कुठे येतो? आणि केवळ दारूच नव्हे, तर उपाहारगृहे आणि अन्य व्यवहारदेखील सुरू करण्याचीही सूचना राजसाहेब यांनी केली, हे या रडतराऊतांच्या रिकाम्या डोक्यात शिरलेले दिसत नाही. त्यामुळेच राजसाहेबांच्या विधायक सूचनेची खिल्ली उडवण्याचा विचार आला असावा. आणखी एक, तुमचे संकटमोचक अजित पवारांनीही हीच मागणी करणारे पत्र देशाच्या प्रधानमंत्र्यांना लिहीले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही असेच विधान काही दिवसांपूर्वी केले होते. तेव्हा त्यांची खिल्ली उडवण्याची हिंमत या बोरूबहाद्दराला झाली नाही, की मालकांची भीती वाटली? बोला रडत राऊत बोला!

नागू सयाजी वाडीतल्या बोरूबहाद्दरांची ‘फ्रायडे नाईट’ जोरदार रंगली असावी, आणि त्याच हॅगओव्हरमध्ये राजसाहेबांच्या पत्रातले सविस्तर मुद्दे बुडाले. की जे राजसाहेबांना सुचलं ते आपल्याला आधी का सुचलं नाही, या दु:खाच्या बेहोषीत ‘डाईन, वाईन...’ वगैरे शब्दांचे खेळ कागदावर सांडले?"

काय होता आजचा सामनाचा अग्रलेख?

"सध्या मोकळा वेळ आहे, रिकामा मित्रपरिवार आहे, कोरोना संकटाचा बहाणा आहे, पण घरात व बाजारात मद्य नसल्याने मोठय़ा वर्गाची तडफड सुरू आहे. अशा सर्व तगमगणाऱ्या जीवांचे दु:ख कलावंत मनाच्या राज ठाकरे यांनी सरकारदरबारी मांडले आहे. राज्यातील लाखो-कोटी मद्यप्रेमींच्या भावनांची खदखद व्यक्त करून राज यांनी मोठेच उपकार केले आहेत. गेले ३५ दिवस महाराष्ट्रातील उपाहारगृहे, पोळीभाजी केंद्रे बंद आहेत. ही पोळीभाजी केंद्रे, उपाहारगृहेसुद्धा सुरू व्हावीत. तसेच राज्य चालविण्यासाठी महसुलाची गरज लक्षात घेऊन नियमांचे पालन करून मद्यविक्रीला परवानगी देण्याचा विचार करावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.या मागणीमुळे घरोघरच्या रिकाम्या बाटल्या, प्यालेही फसफसू लागले आहेत. राज ठाकरे यांच्या मागणीत दम आहे व त्यांनी अनेक जिवांच्या कोरडय़ा घशांची काळजी घेणारी मागणी केली आहे. त्यामुळे हे ‘कोरडवाहू’ श्रमिक लोक राज ठाकरे यांची ‘तळी’ उचलून धरतील याबाबत आमच्या मनात शंका नाही, पण ही मागणी करून दोन शंका लोकांच्या मनात निर्माण केल्या. राज ठाकरे यांनी ही जी रंगीत-संगीत मागणी केली त्यामागे नक्की राज्याच्या महसुलाचाच विचार आहे ना? की ‘तळीरामां’च्या कोरड्या घशाच्या चिंतेतून मनसेप्रमुखांनी ही फेसाळणारी मागणी केली? महाराष्ट्राचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी ही मागणी असली तरी एक समस्या आहेच. कारण ‘लॉकडाऊन’मुळे ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे फक्त ‘वाइन शॉप’च बंद आहेत असे नाही तर राज्यातील मद्यनिर्मिती करणारे कारखानेही बंद पडले आहेत. त्यामुळे आधी हे कारखाने सुरू करावे लागतील तेव्हाच त्यांचा माल वाईन शॉपपर्यंत पोहोचेल. केवळ दुकाने सुरू होऊन दारूचा महसूल मिळत नसतो.

आधी कारखाने मग दुकाने चालू करावी लागतील. कारखाने सुरू करायचे म्हणजे कामगारांची गर्दी व वाईन शॉप सुरू करायचे म्हणजे अक्षरश: रेटारेटी व हाणामारी. लोकं भाजी, अन्न, धान्य वगैरे शिस्तीत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून घेत आहेत, पण वाईन शॉपबाहेर रांगा लागतील तेव्हा काय नजारा असेल त्याची कल्पनाच करवत नाही. पस्तिसेक दिवसांचा उपवास संपवून लोकं दारू खरेदीसाठी बाहेर पडतील तेव्हा अनेकांची अवस्था ही भुकेल्या लांडग्यासारखीच असेल. मागील साधारण ३५ दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात चोऱ्या-माऱ्या, दरोडे असे गुन्हे घडले नाहीत, पण मुंबई-ठाणे आणि अन्यत्र जे काही दरोडे पडले ते वाईन शॉपवरच, जी लूटमार झाली ती वाईन शॉपचीच.

मोठा वर्ग ज्याप्रमाणे ‘राईस-प्लेट’वर अवलंबून आहे तितकाच तो ‘क्वार्टर’, ‘पेग’वरही अवलंबून असल्याची बहुमोल माहिती सरकारसमोर मांडली आहे. कोरोना लॉकडाऊन काळात जनतेला काय हवे, काय नको, राज्याची आर्थिक स्थिती कशी सुधारेल, लोकांना कसा दिलासा देता येईल यावर खरं तर राज्यातील प्रमुख विरोधी पक्षाने तळाशी जाऊन विचार केला पाहिजे. मात्र असा ‘तळ’ गाठून विचार करणे जितके राज यांना जमले तितके राज्याच्या प्रमुख विरोधी पक्षाला जमले नाही. म्हणूनच ते भरकटल्यासारखे अंदाधुंद नशेत फिरत आहेत."

संंपादन - अक्षय शितोळे

First published: April 25, 2020, 12:59 PM IST

ताज्या बातम्या