Home /News /news /

वयाच्या 65व्या वर्षी व्यावसायिक बनण्याचं धैर्य दाखवणारे Maruti Suzuki चे सर्वेसर्वा जगदीश खट्टर

वयाच्या 65व्या वर्षी व्यावसायिक बनण्याचं धैर्य दाखवणारे Maruti Suzuki चे सर्वेसर्वा जगदीश खट्टर

अनेकांना नव्या कारचं स्वप्न उपलब्ध पैशांत पूर्ण करणं जमत नाही. त्यांच्यासाठी त्यांच्या बजेटमध्ये चांगली प्री-ओन्ड कार उपलब्ध करून देण्याचं त्यांचं उद्दिष्ट होतं.

नवी दिल्ली, 28 एप्रिल : वयाच्या 65व्या वर्षी जेव्हा बहुतांश व्यक्ती निवृत्त होऊन आपल्या नातवंडांना बागेत फिरवत असतात, त्या वयात मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे माजी सर्वेसर्वा जगदीश खट्टर (Jagdish Khattar) त्यांचा स्वतःचा प्रकल्प उभारण्यात मग्न होते. मल्टिब्रँड प्री-ओन्ड (Mutibrand Pre-Owned Car) कार विक्रीचा तो प्रकल्प होता. अनेकांना नव्या कारचं स्वप्न उपलब्ध पैशांत पूर्ण करणं जमत नाही. त्यांच्यासाठी त्यांच्या बजेटमध्ये चांगली प्री-ओन्ड कार उपलब्ध करून देण्याचं त्यांचं उद्दिष्ट होतं. हे खट्टर यांच्यासाठी अज्ञात क्षेत्र नव्हतं. कारण मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू (Maruti Suzuki True Value) या भारतातल्या ऑर्गनाइज्ड सेग्मेंटमधल्या युज्ड कार्ससाठीच्या (Used Cars) मोठ्या मल्टिब्रँड प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या प्लॅटफॉर्म मागची कल्पना खट्टर यांचीच होती. 2002 साली खट्टर यांनी MSIL चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून सूत्रं हाती घेतली. त्याआधी वर्षभर'ट्रू व्हॅल्यू'ची उभारणी झाली होती. 'ट्रू व्हॅल्यू'मुळे बाजारपेठेत स्ट्राँग ब्रँड रिकॉल व्हॅल्यू तयार व्हायला मदत झाली. 2008 मध्ये म्हणजेच MSIL मधून निवृत्त होऊन एक वर्ष होण्याआधीच खट्टर यांनी 'कार्नेशन ऑटो' (Carnation Auto) आकाराला आणली. त्यासाठी प्रेमजी इन्व्हेस्ट आणि IFCI व्हेंचर्स आदींनी गुंतवणूक केली होती. भारतात विकल्या गेलेल्या प्रत्येक नव्या कारमागे एक वापरलेली कार देशभरात विकली जाते. खट्टर यांना मात्र हे केवळ हिमनगाचं टोक आहे असं वाटत होतं आणि ते खरं ठरलं. 2008 मध्ये नव्या कार्स आणि वापरलेल्या कार्स यांचं प्रमाण 1:1 असं होतं. त्यानंतर वापरलेल्या कार्सची मागणी खूप वाढली. 2020 च्या आर्थिक वर्षात 42 लाख युज्ड कार्स विकल्या गेल्या, तर 27.7 लाख नव्या कार्स विकल्या गेल्या. म्हणजे हे प्रमाण 1:1.5 एवढं झालं.

(वाचा - तुम्ही Oximeter चा चुकीचा वापर तर करत नाही ना? केंद्राने सांगितली योग्य पद्धत)

प्रत्येक वापरलेली कार विकताना 160 पॉइंट क्वालिटी चेक प्रोसेस, फायनान्स, मोटार इन्शुरन्स, प्रॉपर पेपरवर्क, विक्रीपश्चात सेवा अशा विविध सेवांमुळे कार्नेशन ऑटो या कंपनीने ऑर्गनाइज्ड, सर्टिफाइड प्री-ओन्ड कारच्या बाजारपेठेत महत्त्वाचं स्थान निर्माण केलं. खट्टर यांची मोठी कल्पना क्लिक झाली. 2011 मध्ये भारतात आर्थिक मंदी आली. त्यामुळे तीन आर्थिक वर्षं भारताला फटका बसला. त्यामुळे कार्नेशन ऑटो या कंपनीच्या विकासाला खीळ बसली. त्यानंतर खट्टर यांना माघार घ्यावी लागली. त्यांनी त्यात आपली आयुष्यभराची पुंजी घातली होती, पण सरते शेवटी ही कंपनी दिवाळखोरीत निघाली आणि पंजाब नॅशनल बँकेकडून घेतलेली कर्जं फेडता आली नाहीत. 2019 च्या अखेरीला सीबीआयने खट्टर यांच्यावर 110 कोटी रुपयांच्या कथित बँक कर्ज घोटाळ्याचा आरोप ठेवून गुन्हा दाखल केला, मात्र माजी सनदी अधिकारी असलेल्या खट्टर यांनी कार्नेशन कंपनीच्या आर्थिक व्यवस्थापनात कोणतेही घोटाळे नसल्याचा दावा केला. सविस्तर फॉरेन्सिक ऑडिटही त्यांनी सादर केलं. स्विफ्ट, न्यू वॅगन आर आणि झेन एस्टिलो या मॉडेल्सचं लाँचिंग करणारी व्यक्ती म्हणून खट्टर यांची ओळख होती. हरियाणातल्या मानेसर इथला MSIL चा प्लँटही त्यांच्या कारकिर्दीत उभारला गेला. खट्टर हे मारुती सुझुकीचे शेवटचे भारतीय सीईओ ठरले. त्यांच्या नंतर त्या पदावर जपानी व्यक्ती आल्या.

(वाचा - SBI Recruitment 2021: SBI मध्ये 5237 जागांसाठी बंपर भरती; पाहा कसा कराल अर्ज)

26 एप्रिल 2021 रोजी, वयाच्या 78व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर कॉर्पोरेट सेक्टरसह सरकारमधल्या अनेक मंत्र्यांनीही शोक व्यक्त केला. मारुती सुझुकीचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी सांगितलं, 'ते एक उत्तम सनदी अधिकारी होते आणि मारुती सुझुकीत मी यावं यासाठी त्यांनी मला गळ घातली होती. कंपनीच्या वाढीसाठी त्यांचं योगदान मोठंआहे. ते एक उत्तम माणूस आणि मित्र होते. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे.' नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, 'जगदीश खट्टर हे कल्पनांनी, ऊर्जेने आणि सकारात्मकतेने भरलेलं व्यक्तिमत्त्व होतं. सरकारी आणि खासगी क्षेत्रातल्या उत्तम कामगिरीसाठी ते ओळखले जातात. मारुती कंपनीसाठी त्यांचं योगदान मोठं आहे. त्यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे.' 'जगदीश खट्टर यांच्या निधनाचं वृत्त ऐकून दुःख झालं. ऑटो इंडस्ट्रीसाठी त्यांचं योगदान मोठं होतं,'अशी भावना' एमजी मोटर इंडिया'चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा यांनी ट्विटद्वारे व्यक्त केली आहे.
First published:

Tags: Maruti suzuki cars

पुढील बातम्या