नवी दिल्ली 17 एप्रिल : कल्पना करा की एखादी व्यक्ती 453 तास 40 मिनिटे म्हणजे 19 दिवस डोळे न मिटता जागा आहे. असं होऊच शकत नाही, असं तुम्हाला वाटेल. पण असं झालं आहे. 1986 मध्ये रॉबर्ट मॅकडोनाल्ड नावाच्या व्यक्तीने हा पराक्रम केला आणि सर्वाधिक वेळ जागं राहण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. मात्र हे यश इतकं धोकादायक होतं, की जगभरात आव्हानात्मक विक्रम नोंदवणाऱ्या गिनीज बुकवाल्यांनीही हार मानली. त्यांनी या प्रकारची गणनाच बंद केली.
डेली मेलच्या वृत्तानुसार, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तेव्हापासून लागोपाठ अनेक दिवस जागे राहणाऱ्यांची नोंदच केली जात नाही. मात्र,त्यांनी त्यांच्या वेबसाइटवर मॅकडोनाल्डच्या विजयाचा उल्लेख केला आहे. आतापर्यंत हा विक्रम कोणीही मोडू शकलेलं नाही, असंही सांगण्यात आलं आहे. हा एक धोकादायक खेळ असल्याचं गिनीज बुकचं मत आहे. निद्रानाश या आजारामुळे अनेकांना अशा समस्या उद्भवू शकतात. यासोबतच हे पुढेही चालू ठेवलं तर हे त्याचा प्रचार केल्यासारखं होईल, जे माणसांच्या हिताचं नसेल. युनिलाडच्या अहवालात म्हटलं आहे, की मॅकडोनाल्डच्या आधी 1963 मध्ये दोन विद्यार्थ्यांनी विक्रम केला होता. शालेय विज्ञान प्रकल्पासाठी ते 11 दिवस सतत जागे राहिले. त्यानंतर सर्वाधिक वेळ जागे राहण्याचा विश्वविक्रम नोंदवला गेला. रँडी गार्डनर आणि ब्रूस मॅकअलिस्टर नावाच्या या मुलांना हे जाणून घ्यायचं होतं की, त्यांना पुरेशी झोप न मिळाल्यास त्यांच्या मेंदूवर किती परिणाम होतो. 2018 मध्ये, मॅकअलिस्टरने बीबीसीला सांगितलं की, आम्ही मूर्ख होतो आणि तरुण मूर्ख असतातच. मात्र यामुळे आपल्याला आयुष्यात पुढे पश्चात्ताप करावा लागेल हे माहित नव्हतं. मॅकअलिस्टर म्हणाले- रँडी गार्डनरने हे आव्हान स्वीकारलं होतं, मी फक्त त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी जागं राहिलो. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील स्लीप रिसर्चर विल्यम डिमेंट यांनी त्यांची कामगिरी नोंदवली आणि दीर्घ संशोधन केलं. त्यांना असं आढळलं की रॅंडी गार्डनर अल्पकालीन स्मृती गमावण्याच्या स्थितीत गेला आहे. एकाग्रतेचा अभाव होता. मतिभ्रमाला बळी पडू लागला होता. रॅंडीच्या मेंदूच्या स्कॅनवरून असं दिसून आलं की त्याचं डोकं आऊट झालं होतं. मेंदूचे काही भाग झोपेच्या अवस्थेत होते, काही भाग जागे होते. अनेक वर्षांनंतर 2007 मध्ये, टोनी राइट 266 तास जागे राहिले. त्याला आशा होती की तो रँडीचा विक्रम मोडेल, पण तसे होऊ शकले नाही. नंतर त्याने झोपेशिवाय शरीरात आणि मानसिक स्थितीत काय बदल होतात, ते सांगितले. त्याने कबूल केलं की ते थकवणारं आहे आणि मेंदू अजिबात काम करत नाही.