मुंबई, 17 जुलै : मागच्या दोन आठवड्यांपासून राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान राज्यात झालेल्या पावसाने नद्यांना पूर आला आहे तर काही भागात महापुराची परिस्थीतीनिर्माण झाली आहे. जून महिन्यात पाऊस कमी असल्याने शेतकरी हवालदिल होता परंतु जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून झालेल्या पावसाने शेतकरी सुखावला आहे. ऊस पिकासोबत अन्य पिकांनाही चांगला पाऊस झाल्याने पिके जोमात येणार आहेत. दरम्यान हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्यात पुढचे दोनच दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. 20 जुलैपासून सर्वत्र उघडीप असेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. (Maharashtra Rain Update)
हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढचे दोन दिवस कोकणात अतिवृष्टीचा म्हणजे रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच राज्यातील अन्य भागात हलका ते मध्यम पाऊस राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्र व गुजरात किनारपट्टीवर हवेची द्रोणीय स्थिती झाली आहे. हा कमी दाबाचा पट्टा 20 रोजी ओमानकडे सरकणार असल्याने 20 जुलैपासून राज्यातील पाऊस कमी होण्याची शक्यात वर्तवली आहे. मात्र, 18 व 19 रोजी काही भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.
हे ही वाचा : अनुस्कुरा घाटात पुन्हा कोसळली दरड, पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प
24 तासांत फक्त कोकणात अतिमुसळधार
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गुजरात ते महाराष्ट्र किनारपट्टीवर वाऱ्याची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी 24 तासांत कोकणासह गोव्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मात्र महाराष्ट्रात उर्वरित भागात आगामी दोन दिवसांत हलका ते मध्यम पाऊस राहील. दि. 20 नंतर मात्र राज्यातील बहुतांश भागात उघडीपीची शक्यता आहे, असा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तवला आहे.
या भागात यलो अलर्ट (मध्यम पाऊस) : 18 जुलै - रत्नागिरी, बुलडाणा, अकोला, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली. 19 जुलै - परभणी, नांदेड, हिंगोली, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली. 20 जून – चंद्रपूर, गडचिरोली.
हे ही वाचा : कोल्हापुरातही शिवसेना फुटली? दोन्ही खासदार शिंदे गटाच्या वाटेवर, घडामोडी नेमक्या कोणत्या दिशेला?
हवामान विभागाचे तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी हवामान बदलाबद्दल एक महत्त्वाची माहिती दिली आहे. अरबी समुद्रात प्रचंड वेगाने वारे वाहणार आहेत. यांचा वेग तब्बल ताशी 45 ते 55 किमी असा असणार आहे. त्यामुळे मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना होसाळीकर यांनी मासेमारीसाठी संबंधित कालावधीत जावू नये, असं आवाहन केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra News, Mumbai rain, Rain flood, Rainfall, Weather, Weather update