मुंबई, 2 जुलै : शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीच्या एक वर्षानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठा उलटफेर झाला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांनी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सत्तेत सहभागी झालो आहोत, असं स्पष्ट केलं. तसंच आगामी निवडणुकांमध्ये आम्ही शिवसेना-भाजपसोबत एकत्र निवडणूक लढणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हावरच आम्ही निवडणूक लढवणार असल्याचं सांगत अजित पवारांनी थेट पक्षावरच दावा केला आहे. सरकारमध्ये सहभागी होत असताना शरद पवारांचा आशीर्वाद मिळाला का? असा प्रश्न विचारला असता आपल्याला सगळ्यांनी आशीर्वाद दिला असल्याचं अजित पवार म्हणाले. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे आमदार आपल्यासोबत असल्याचा दावाही अजित पवार यांनी केला. अजित पवार सगळे आमदार आपल्यासोबत असल्याचं म्हणत असले तरी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र सूचक ट्वीट केलं आहे. जयंत पाटील यांनी शरद पवारांसोबतचा एक फोटो ट्वीट केला आहे. मी साहेबांबरोबर असं कॅप्शनही जयंत पाटील यांनी या फोटोला दिलं आहे.
मी साहेबांबरोबर... pic.twitter.com/npZZVEvKk2
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 2, 2023
जयंत पाटील यांच्यासोबत आमदार अनिल देशमुख यांनीही आपण शरद पवारांसोबत असल्याचं स्पष्ट केलं आहे. अनिल देशमुख यांनीही जयंत पाटलांप्रमाणेच शरद पवारांसोबतचा फोटो ट्वीट केला आहे.
मी आणि आमचे सगळे सहकारी साहेबांसोबतच!! pic.twitter.com/bqW6nZhNN8
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) July 2, 2023
अजित पवार यांनी शुक्रवारीच त्यांच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. यानंतर आज त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता राष्ट्रवादीने जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेतेपदी आणि प्रतोद म्हणून नियुक्ती केली आहे. राष्ट्रवादीचे विधानसभेतले प्रतोद अनिल भाईदास पाटील हेदेखील अजित पवारांसोबत गेल्यामुळे राष्ट्रवादीने जितेंद्र आव्हाड यांच्याकडे ही जबाबदारी सोपावली आहे.