नवी दिल्ली, 11 मे : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल अखेर लागला आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निकालामध्ये शिंदे गट, राज्यपाल यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत, तसंच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद सोडणं चूक होती, असं म्हणत त्यांनाही दिलासा द्यायला नकार दिला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवण्याचा निर्णय कोर्टाने घेतला आहे. तसंच शिंदे गटाने भरत गोगावले यांची व्हीप म्हणून केलेली नियुक्ती बेकायदेशीर असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून पहिली रिएक्शन आली आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी संजय राऊत आणि अनिल परब यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला नाही तरी हे सरकार 15 दिवसांमध्ये कोसळेल कारण सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना ठराविक वेळेमध्ये आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर निर्णय घ्यावा, असे आदेश दिले आहेत, असं अनिल परब म्हणाले आहेत. ‘उद्धव ठाकरेंचं सरकार बेकायदेशीरपणे घालवलं आणि हे सरकार घटनाबाह्य आहे. 16 आमदारांचा निकाल विधानसभा अध्यक्षांकडे येणार असेल तर येऊ द्या, व्हीपच बेकायदेशीर आहे. संपूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर आहे. विधानसभा अध्यक्षांनी या बेकायदेशीर प्रक्रियेवर भूमिका घ्यायला पाहिजे. शिंदे आणि फडणवीस यांनी उगाच पेढे वाटू नयेत, थोडीतरी नैतिकता असेल आणि खोक्यांची पापं धुवून काढायची असतील, तर सरकारने ताबडतोब राजीनामा द्यायला हवा,’ अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.