• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • डॉल्बीसह मिरवणूक काढणाऱ्यांना दणका, तब्बल 60 जणांविरोधात गुन्हा दाखल

डॉल्बीसह मिरवणूक काढणाऱ्यांना दणका, तब्बल 60 जणांविरोधात गुन्हा दाखल

जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने कसबा तारळे या गावातील तब्बल 60 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • Share this:
कोल्हापूर, 25 फेब्रुवारी : पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, सातारा आणि सांगली या तिन्ही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं चित्र आहे. मात्र अशा स्थितीतच कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका गावात पालखी सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्यात सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याची बातमी 'न्यूज18 लोकमत'ने दाखवल्यानंतर आता जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने कसबा तारळे या गावातील तब्बल 60 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यातही कमी प्रमाणात का होईना मात्र कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सगळ्या यात्रा-जत्रा धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. राजकीय सभा आणि आंदोलनांनाही बंदी घालण्यात आली आहे. असं असतानाही कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे या गावात काल बाळूमामा यांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. या महिलांनी मास्क परिधान केले नव्हते आणि सोशल डिस्टन्सिंग पाळलं नव्हतं. महिलांच्या सोबतच या पालखी सोहळ्यात पुरुष गावकरीही सहभागी झाले होते. त्यांनी तर डॉल्बीच्या ठेक्यावर ताल धरला होता. याबाबतचे वृत्त 'न्यूज18 लोकमत'ने प्रसारित केल्यानंतर प्रशासनाने त्याची गंभीरपणे दखल घेतली आहे. हेही वाचा - महाराष्ट्रात कोरोनाचं नवं रूप; नव्या स्ट्रेनपासून कसा कराल स्वत:चा बचाव? राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये कसबा तारळे गावातील 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनापरवाना डॉल्बी आणून लोकांची गर्दी जमवल्याप्रकरणी कलम 33 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक गावांनी यात्रा सण उत्सव जत्रा रद्द केल्या असताना कसबा तारळे या गावाने मात्र कोरोना गेल्या वर्षीप्रमाणे पालखी सोहळा साजरा केला आणि या सोहळ्यात कोरोना बाबतचे नियम पायदळी तुडवले. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने याबाबत त्वरित गंभीर दखल घेत कारवाई केल्याने जिल्ह्यातून प्रशासनाच्या भूमिकेबाबत समाधान व्यक्त होत आहे.
Published by:Akshay Shitole
First published: