मुंबई, 25 फेब्रुवारी : महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसच्या दोन नव्या स्ट्रेननं शिरकाव केला आहे. हा स्ट्रेन अधिक संसर्गजन्य असल्याचं सांगितलं आहे. राज्यात कोरोनाचा उद्रेकही वाढला आहे. त्यामुळे कोरोनाव्हायरसचा हे नवे स्ट्रेन नेमके आहेत तरी काय? ते नेमके कुठून आले?, यामध्ये नेमके काय बदल झालेले आहेत? मूळ कोरोनाव्हायरसपेक्षा हे नवे स्ट्रेन किती धोकादायक आणि घातक आहेत आणि त्यांच्यापासून नेमका आपला बचाव कसा करावा?, असे बरेच प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले असतील. तुमच्या मनातील अशाच काही प्रश्नांची उत्तरं.
आतापर्यंत देशात कोरोना विषाणू म्हणजेच ‘एसएआरएस-कोव्ह-2’चे (Sars-Cov-2) पाच वेगवेगळे प्रकार आढळले आहेत. त्यामध्ये एन 440 के (N440K), ई 484 (E484K) के यासह यूके (UK) , दक्षिण आफ्रिका (South Africa), ब्राझीलमधील (Brazil) प्रकारांचा समावेश आहे. यातील N440K आणि E484K हे महाराष्ट्रातही आढळले आहेत.
भारतातील कोणत्या राज्यांमध्ये एन440 के आणि ई 484K के हे दोन नवीन प्रकार सापडले आहेत?
कोरोना विषाणूचे हे दोन नवीन प्रकार महाराष्ट्र, केरळ आणि तेलंगणा या राज्यांमध्ये आढळले आहेत.
हे दोन्ही नवीन प्रकार फक्त भारतातच आहेत का?
नाही, हे दोन्ही बदललेल्या रचनेचे म्हणजेच मूळ विषाणूच्या रचनेत उत्परिवर्तन (Mutation) घडून तयार झालेले विषाणू नवीनही नाहीत आणि ते फक्त भारतात आहेत असंही नाही. इतर देशातही ते आढळले असून, सध्या ते देशातील काही राज्यांमध्येच आढळले आहेत, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआरचे (ICMR) महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी ‘न्यूज 18’शी बोलताना दिली.
संसर्गाच्या नव्या लाटेसाठी हे नवीन प्रकार जबाबदार आहेत का?
संसर्गाच्या नव्या लाटेसाठी हे नवीन रचनेचे विषाणू जबाबदार असल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
या नवीन प्रकारच्या विषाणूची लागण झालेले किती रुग्ण भारतात आढळले आहेत ?
ब्रिटन (यूके), ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या बदललेल्या रचनेच्या कोरोना विषाणूची लागण झालेले 194 रुग्ण भारतात आढळले आहेत, असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितलं. ई 484 क्यू हा प्रकार महाराष्ट्रात मार्च आणि जुलैमध्ये आढळला होता, तर एन 440 के हा प्रकार मे ते सप्टेंबर या कालावधीत तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि आसाम या राज्यांमध्ये आढळला होता.
एन 440के आणि ई 484के प्रकारांबद्दल आपल्याला
काय माहिती आहे ?
सध्या देशातील कोरोना विषाणूमध्ये होणाऱ्या उत्परिवर्तनांवर बारकाईनं लक्ष दिलं जात असून, 3500 वेगवेगळ्या रचना बनवण्यात आल्या आहेत, असं डॉ. पॉल यांनी म्हटलं आहे. विषाणूच्या गुणधर्मांमध्ये किंवा वैशिष्ट्यांमध्ये काही बदल होत आहेत का याचा बारकाईनं शोध घेतला जात आहे. भारतीय एसएआरएस-कोव्ह 2 जिनोमिक्स कन्सोर्टियमच्या (Sars- cov-2 Genomics Consortium) नामांकित वैज्ञानिक सल्लागार गटानं दिलेल्या माहितीच्या आधारे आणि विश्लेषणानुसार काही जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या संसर्गाच्या तीव्रतेत या उत्परिवर्तन झालेल्या विषाणूंचा प्रादुर्भाव दिसून आलेला नाही, हे स्पष्ट दिसत आहे. अर्थात परिस्थितीवर आम्ही बारकाईनं लक्ष ठेवून आहोत, असं डॉ. पॉल यांनी सांगितलं.
हे वाचा - फक्त 5 जिल्ह्यांनी वाढवलं टेन्शन; झपाट्याने वाढले राज्यातील कोरोना रुग्ण
देशातील सार्स-कोव्ह-2 साथीच्या सर्वेक्षण आणि प्रयोगशाळेत माहिती देण्यासाठी डिसेंबर अखेरीस एसएआरएस-कोव्ह 2 जिनोमिक्स कन्सोर्टियमची स्थापना करण्यात आली होती. सामान्य माणसाच्या दृष्टीने, ई484के (E484K) हे नाव नकाशातील निर्देशक चिन्हांसारखं आहे. 484 क्रमांक हा उत्परिवर्तनाचे अचूक स्थान सांगणारा क्रमांक आहे, ई हे अक्षर अमिनो अॅसिडचा संकेत देतं तर के हे अक्षर बदल झालेल्या अमिनो अॅसिडचे अस्तित्व दर्शवतं.
कोरोना विषाणूच्या यूकेमधील प्रकाराबद्दल काय माहिती आहे?
यूके किंवा केंट व्हेरिएंट (बी.1.1.7) हा विषाणू 70 टक्के अधिक संसर्गजन्य असल्याचं आढळलं आहे. त्यामुळे इतर विषाणूंच्या तुलनेत यामुळे मृत्यूचा धोकाही अधिक आहे. अर्थात याची खात्री करण्यासाठी अधिक अभ्यास करणं आवश्यक आहे. डेन्मार्क, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, फ्रान्स, स्पेन, स्वित्झर्लंड, जर्मनी, कॅनडा, जपान, लेबनॉन आणि सिंगापूर या देशांमध्ये हा विषाणू आढळल्याचं या देशांनी स्पष्ट केलं आहे.
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या प्रकाराबद्दल काय माहिती आहे?
कोरोना विषाणूचा दक्षिण आफ्रिकन प्रकार (501Y.V2 किंवा B.1.351) डिसेंबर 2020 मध्ये प्रथम आढळला. कोविड-19च्या विषाणूला शरीरात प्रवेश करण्यासाठी सक्षम बनवणार्या स्पाइक प्रोटीनसह अनेक वैशिष्ट्यांमध्ये हा (सार्स-कोव्ह-2) विषाणूपेक्षा वेगळा आहे.
हे वाचा - 8807 रुग्ण, 80 मृत्यू; 2021 मधली महाराष्ट्राची कोरोनाची धक्कादायक आकडेवारी
यूकेत आढळलेल्या विषाणूप्रमाणेच याच्याही संक्रमणाचा वेग अधिक आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेतील प्रकार कोविड-19 च्या विषाणूपेक्षा अधिक सामर्थ्यवान किंवा प्राणघातक नाही तसंच वृद्ध व्यक्तींवर त्याचा जास्त परिणाम झाला आहे, असं आधीच्या अहवालात नमूद करण्यात आलं होतं. पण नवीन अहवालामध्ये तरुणांमध्ये याचा संसर्ग अधिक होत असल्याचं म्हटलं आहे.
ब्राझिलियन विषाणू प्रकाराबद्दल काय माहित आहे?
ब्राझीलमध्ये आढळलेला नवीन संरचना असलेला कोरोना विषाणू (पी.1) जुलैमध्ये आढळून आला आणि हे ई484के (E484K) चं उत्परिवर्तन आहे. यूके आणि दक्षिण आफ्रिकन प्रकारांप्रमाणेच ब्राझीलमध्ये आढळलेला हा विषाणू अधिक संसर्गजन्य असू शकतो. प्रतिजैविके नष्ट करण्याची त्याची क्षमता असू शकते.
उत्परिवर्तन म्हणजे काय?
उत्परिवर्तन म्हणजे विषाणूच्या अनुवांशिक क्रमामधील बदल जो त्याचं पुनरुत्पादन घडवतो. हा विषाणू स्वत: पेशीशी संलग्न होऊन त्या पेशींमध्ये त्याचे अनुवांशिक गुणधर्म पसरवतो. जेव्हा पेशी या विरुद्ध लढा देण्याचा प्रयत्न करतात तेव्हा हा विषाणू टिकून राहण्यासाठी नवीन मार्ग शोधतो. त्यासाठी तो आपल्या संरचनेत बदल घडवतो आणि एक नवीन संरचना असलेला विषाणू तयार होतो.
आपण स्वतःला कसे सुरक्षित ठेवू शकतो?
कोरोना विषाणूपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आपले हात वारंवार धुणे, लोकांपासून योग्य अंतर ठेवणे आणि चेहरा झाकणे यासारखे उपाय महत्त्वाचे आहेत. यामुळे संसर्ग रोखण्यास मदत होते. या विषाणूची नवीन रूपे अधिक सहजतेने संक्रमित होतात, त्यामुळं पूर्वीपेक्षा आता अधिक सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona virus in india, Coronavirus, Health, Lifestyle, Maharashtra, Sars-cov-2, Wellness