मुंबई, 17 जुलै : मधुमेही रुग्णांना कोरोनाचा (CORONAVIRUS) धोका जास्त आहे हे आपण सर्वांना माहितीच आहे. मात्र आता ज्या रुग्णांना मधुमेह नाही त्या कोरोना रुग्णांच्या शरीरातील ब्लड शुगरवर (blood sugar) कोरोनामुळे परिणाम होतो आहे का? किंवा कोरोनामुळे मधुमेहाचा धोका आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. कारण काही कोरोना रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढल्याचं दिसून आलं आहे.
उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, असामान्य कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसेराइडची पातळी हे सर्व मधुमेहास कारणीभूत ठरतं. मात्र आता ज्या रुग्णांना मधुमेहाचा इतिहास नाही. अशा रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण सतत वाढत असल्याचं डॉक्टरांना दिसून आलं आहे आणि डॉक्टरांनी त्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
41 वर्षीय महिलेला पाच दिवसांपासून ताप येणं, घसा खवखवणं आणि अंगदुखी अशी लक्षणं दिसत होती. शिवाय तीन दिवसांपासून तिला श्वास घ्यायलाही त्रास होत होता. या महिलेला उपचारासाठी मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. दरम्यान या महिलेच्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढलं होतं. महिलेला याआधी मधुमेह नसल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे कोरोनामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढून मधुमेहाचा धोका उद्भवू शकतो का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हे वाचा - संपूर्ण जगाला कोरोना लस पुरवण्यात भारत सक्षम; बिल गेट्स यांना विश्वास
मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ट हॉस्पिटलच्या क्रिटिकल केअरचे प्रमुख आणि कोविड-19 टास्क फोर्स समितीचे सदस्य डॉ. केदार तोरस्कर यांनी सांगितलं, "ज्या रुग्णांना मधुमेहाचा इतिहास नाही. अशा रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण सतत वाढत असल्याने डॉक्टरांकरिता हे चिंताजनक ठरत आहे. रुग्णालयात अशी सुमारे 4 ते 5 रुग्ण आढळत आहेत. मधुमेहाचे रुग्ण देखील केटोएसीडोसिससाठीसारखी समस्या घेऊन रुग्णालयात येत आहेत"
"कोरोनाचा विषाणू माणसाच्या शरीरातील पेशींमध्ये प्रवेश करण्यास एसीई-2 हे प्रथिन सहाय्यक ठरते. हे प्रथिन फुप्फुसच नव्हे तर स्वादुपिंड, लहान आतडे, मूत्रपिंडातही अस्तित्वात असते. पेशींमध्ये कोरोनाच्या विषाणूने शिरकाव केल्यानंतर शरीरातील ग्लुकोजच्या प्रमाणावर त्याचा विपरित परिणाम होतो अशी माहिती डॉ केदार तोरस्कर यांनी दिली.
हे वाचा - जेव्हा रोगप्रतिकारक शक्तीच शरीरावर हल्ला करते; उद्भवतात या समस्या
तर महाराष्ट्र आयएमएचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, "कोरोनामुळे रक्तातील साखरेच्या पातळीवर थेट परिणाम होत नाही. जर या महिलेच्या उपचारादरम्यान तिच्या रक्तातील साखरेची पातळी वाढली असेल तर कोरोना रुग्णांना स्टेरॉईड औषधं दिली जातात. त्याचा हा परिणाम असू शकतो. दुसरं म्हणजे या महिलेनं आधी मधुमेहाची चाचणी केली नसावी, म्हणजे तिला मधुमेह असावा मात्र चाचणी न केल्याने तिला आपल्याला मधुमेह आहे याची माहिती नसावी. दरम्यानच्या काळात तिला मधुमेह झालेला असू शकतो आणि तिसरं म्हणजे ती महिला मधुमेहाच्या उंबरठ्यावर असावी. म्हणजे तिला प्री-डायबेटिज असावा"