Home /News /news /

'या' फोटो मागील खरी कहाणी ऐकाल, तर खाकी वर्दीला कराल सॅल्युट!

'या' फोटो मागील खरी कहाणी ऐकाल, तर खाकी वर्दीला कराल सॅल्युट!

लॉकडाउन असल्यामुळे लोकांना घरच्या बाहेर पडणं देखील दुरापास्त झालंय. त्यामुळे याचा अप्रत्यक्ष परिणाम रस्त्यावर फिरणाऱ्या अनेक गरीब आणि भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या जीवांवर देखील झाला आहे.

स्वप्निल घाग, प्रतिनिधी  गुहागर, 18 एप्रिल : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन आयुष्यावर मोठा परिणाम झाला आहे. लॉकडाउन असल्यामुळे लोकांना घरच्या बाहेर पडणं देखील दुरापास्त झालंय. त्यामुळे याचा अप्रत्यक्ष परिणाम रस्त्यावर फिरणाऱ्या अनेक गरीब आणि भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या जीवांवर देखील झाला आहे. शहरी भागात अशा लोकांना काही सामाजिक संस्था आणि सरकारच्या मदतीमुळे काही ना काही खायला मिळत असलं तरी ग्रामीण भागात मात्र, अशा लोकांचे हालच होत असतात. मात्र, गुहागर मधील पोलिसांनी खाकीतही माणुसकी जिवंत असल्याचे दर्शन एका कृतीतून दिलं आहे. त्यांच्या माणुसकीच्या कामाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. हेही वाचा -वायदे बाजारात सोन्याचांदीमध्ये मोठी घसरण, मौल्यवान धातूंची झळाळी उतरली गुहागर तालुक्यातील शृंगारतळी शहरात गेली अनेक दिवस एक मनोरुग्ण भटकताना आढळून आला. या भटकणाऱ्या मनोरुग्णाचे देखील लॉकडाउनमुळे खाण्यापिण्याचे प्रचंड हाल सुरू होते. त्याचे हे हाल शहरातल्या शृंगारतळी येथे बंदोबस्त करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पाहिले आणि त्यांच्या खाकीतला माणूस जागा झाला. लॉकडाउनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद आहे. त्यामुळे शहरातील टपऱ्या, हॉटेल हे गेल्या महिन्याभरापासून बंद आहे. त्यामुळे हॉटेलबाहेर किंवा एखाद्या खाण्याच्या टपरीवर मनोरुग्ण भिकारी आपलं पोट भरत होते. पण रस्तावर कोणीही फिरकत नसल्यामुळे त्यांचे खाण्याचे हाल होत आहे. या मनोरुग्णाचे होणारे हाल पाहून गुहागर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला नियमित जेवण आणि नाष्टा देणे सुरू करत त्याच्या नेहमीच्या जेवणाचा प्रश्न सोडवला आहे. हेही वाचा -राज्यात 20 तारखेनंतर काय-काय होईल सुरू? अजित पवारांनी केलं स्पष्ट लॉकडाउनला आता महिना उलटत आला तरी तो मनोरुग्ण आजही पोलिसांसोबत जेवताना दिसत आहे. मात्र, एवढ्यावर न थांबता पोलिसांनी त्या मनोरुग्णाला व्यवस्थित स्वच्छ करून त्याचे केस, दाढी  करत त्याला चांगले कपडे देत त्याचं संपूर्ण रुपडं पालटण्याची किमया गुहागरच्या पोलिसांनी केली आहे. त्याचं बदललं रुपडं पाहून अनेकांनी पोलिसांच्या या समाजकार्याला सलाम ठोकला आहे. एरवी समाजात कायम पोलिसांबद्दल नकारात्मक बोललं जातं. मात्र, हा फोटो जो तुम्ही पाहताय त्यामुळेतुम्हाला पोलिसांबद्दल आदर वाटेल यात शंका नाही. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या