Home /News /news /

शरद पवारांवरील वक्तव्यावर फडणवीसही संतापले, गोपीचंद पडळकरांना झापले

शरद पवारांवरील वक्तव्यावर फडणवीसही संतापले, गोपीचंद पडळकरांना झापले

'शरद पवार हे राजकीय विरोधक आहे, शत्रू नाही. ज्येष्ठ नेत्यांबद्द्ल असे बोलणे चुकीचे आहे.'

सोलापूर, 24 जून : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर विखारी टीका केली होती. त्यांच्या या टीकेबद्दल विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसंच, पडळकर यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे, असंही सांगितलं. गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य अत्यंत चुकीचे होते. त्यांच्याशी मी चर्चा केली आहे.  शरद पवार साहेब हे राजकीय विरोधक आहे, शत्रू नाही.  ज्येष्ठ नेत्यांबद्द्ल असे बोलणे चुकीचे आहे.  पडळकर यांनी भावनेच्या भरात वक्तव्य केले असून त्यांनी याबद्दल माफी मागितली आहे, असं  देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं. तसंच,  सर्वच पक्षातील लोकांनी बोलताना संयम बाळगला पाहिजे. ज्येष्ठ नेत्यांवर टीका करताना भान बाळगले पाहिजे, असं आवाहनही फडणवीस यांनी केलं. काय म्हणाले होते पडळकर? 'शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. राज्याचे नेतृत्त्व त्यांनी केले पण बहुजन समाजातील लोकांवर अन्याय करण्याची त्यांची भूमिका राहिलेली आहे. त्यांच्या कडे कोणतीही विचारधारा नाही.  फक्त छोट्या छोट्या समाजाना भडकवायचे आणि त्यांना आपल्या बाजूला करायचे आणि अन्याय करायचा एवढेच काम पवार करत आहेत' अशी जहरी टीकाही पडळकरांनी केली. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न त्यांना सोडवायचा नाही. फक्त आरक्षणाचे राजकारण शरद पवार करत आहेत, असा आरोपही पडळकरांनी केला. सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नका - धनंजय मुंडे 'राजकारणात नेम आणि फेम मिळवायचे असले की शरद पवार यांच्यावर टीका करायची हे समजून अनेकजण उचलली जीभ लावली टाळ्याला या उचापती करतात. सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न न करता डिपॉझिट, अस्तित्व टिकून राहील, देवांच्या खोट्या शपथा घ्याव्या लागणार नाही, हे पहावे. बिरोबा यांना सद्बुद्धी देवो!', अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर पलटवार केला आहे. पुण्यात  निषेधार्थ आंदोलन गोपीचंद पडळकर यांनी  शरद पवार यांच्या संदर्भात अतिशय अश्लाघ्य भाषेत वक्तव्य केले आहे, राजकारणात मतभेद असू शकतात. पण एखाद्या व्यक्ती बद्दल इतक्या खालच्या पातळीवर येऊन असे वक्तव्य करणे, भारतीय जनता पक्षाच्या संस्कृतीला शोभते का? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्त अंकुश काकडेंनी उपस्थितीत केला. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गुरुवारी सकाळी 10  वाजता लोकमान्य टिळक पुतळा, मंडई येथे आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन कार्यकर्ते सामाजिक अंतर ठेवून करतील, असंही अंकुश काकडेंनी स्पष्ट केलं.   संपादन - सचिन साळवे
First published:

Tags: Devendra Fadanvis, Sharad pawar, देवेंद्र फडणवीस

पुढील बातम्या