त्र्यंबकेश्वर, 01 जुलै : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे शेकडो वर्षांची परंपरा असलेली पंढरपूरची वारी यंदा रद्द करावी लागली. माऊलींच्या पादूका या शिवशाही बसने पंढरपूरला नेण्यात आल्या होत्या. पण, नाशिकमध्ये एसटी महामंडळाचा दरिद्रीपणा समोर आला आहे. महामंडळाने चक्क निवृत्तीनाथ महाराजांचेच तिकीट फाडले असल्याचं समोर आलं आहे. मंगळवारी त्र्यंबकेश्वरहून सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे 20 वारकऱ्यांसह शिवशाही बस पंढरपूरला रवाना झाली. निवृत्तीनाथ महाराजांची पालखी घेऊन ही बस पंढरपुरात दाखल झाली. परंतु, शरमेची बाब म्हणजे, एसटी महामंडळाने निवृत्तीनाथांनाही तिकीट आकारले. एकूण 20 वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाच्या शिवशाही बसने तब्बल 71 हजार रुपये आकारले. फक्त 48 तासांच्या या प्रवासासाठी ही रक्कम आकारण्यात आली आहे. त्यामुळे वारकऱ्यांनी वर्गणी गोळा करून 71 हजार महामंडळाकडे भरले. त्यानंतरच शिवशाही बसने वारकऱ्यांना पंढरपूरला पोहोचता आले. अशी देखणी दिसते आषाढी एकादशीची वारी; VIDEO तून अनुभवा वारीचा नेत्रदीपक सोहळा त्र्यंबकेश्वरमधून दरवर्षी नित्याप्रमाणे 50 ते 60 हजार वारकरी पायी दिंडीतून पंढरपूरला जात असतात. या काळात त्यांना कोणताही खर्च लागत नाही. परंतु, यंदा कोरोनाच्या परिस्थितीमुळे वारकऱ्यांना अटीशर्थींसह पंढरपूरला पायी न जाता शिवशाही बसने पोहोचावे लागले. पण, त्यासाठीही मंडळाकडून 71 हजार खर्च घेतला आहे. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर, मुख्यमंत्र्यांचं विठ्ठलाला साकडं दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल-रुक्मिणीची बुधवारी पहाटे आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी ‘महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे’, असं साकडं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठ्ठलाच्या चरणी आज घातले. आषाढी एकादशी : भक्तांऐवजी फक्त फुलांनी सजलेल्या विठूरायाचं इथे घ्या थेट दर्शन मुख्यमंत्री म्हणाले, ‘कोरोनामुळे जग, देश तसेच महाराष्ट्रावर मोठे संकट आले आहे. कोरोनाचे हे संकट लवकरात-लवकर दूर करून महाराष्ट्र आणि अवघा देश कोरोनामुक्त होऊ दे. राज्यातील शेतकरी, वारकरी आणि अवघ्या विठ्ठल भक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी आषाढी एकादशीला माऊलींच्या दर्शनाला आलो. बळीराजाला सुखी करण्याचे आणि राज्यातील सर्व नागरिकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपणास बळ द्यावे, अशी मागणी विठ्ठलाकडे केल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. पंढरपूरच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार आहे. त्यासाठी विकास प्रकल्पांना मंजुरी दिली जाईल. त्याबाबतचे प्रस्ताव सादर करावे, असेही त्यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी आणि जनतेने आरोग्याच्या दृष्टीने पंढरपुरात येऊ नये. घरातूनच विठ्ठलाचे नामस्मरण व पूजा करावी, असे आवाहन ठाकरे यांनी भाविकांना केले. वारकरी सांप्रदायाने शासनाच्या वतीने वेळोवळी करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांनी आभार मानले. संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.