दापोली, 14 मे : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. कोरोनाबाधित रुग्णाची पूर्ण देखभाल घेण्याचे काम आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे. परंतु, दापोलीमध्ये एका तरुणाला कोरोनाची लागण झाली याची कुणकुण लागताच त्याने जंगलात पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बोरवली गावातील होम क्वारंटाइन करण्यात आलेल्या तरुणाला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे कळताच पलायन केल्यामुळे खळबळ उडाली आहे. **हेही वाचा -** भारत करणार कोरोनावर मात! 1500 रुग्णांवर WHO करणार ‘या’ 3 औषधांचं ट्रायल दापोली तालुक्यात 13 मे रोजी एकूण चार रूग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यामध्ये सडवे, साकुर्डे आणि बोरीवली येथील दोघांचा समावेश आहे. बोरीवली येथील शाळेत 28 नागरिकांना क्वारंटाइन केलं आहे. मात्र, यातील काही जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले होते. यात एका 25 वर्षीय तरुणाचाही समावेश होता. बोरीवली वरचीवाडी येथे रुग्णवाहिका आपल्याला घेण्यासाठी येणार अशी माहिती या तरुणाला मिळाली. त्यानंतर या तरुणाने आपल्या सहकाऱ्यांना लघुशंका करून येतो असं सांगून बाहेर गेला. पण, बराच वेळ झाला तरी तो काही परतला नाही. तितक्या रुग्णवाहिकाही येऊन पोहोचली. त्यानंतर हा तरूण पळून गेला याची खात्री पटली. हेही वाचा - VIDEO : लॉकडाऊनमध्ये पोटापाण्यासाठी ‘या’ तरुणानं केला महागातला जुगाड! हा तरुण कोरोनाबाधित असून तो पळून गेला, त्यामुळे एकच खळबळ उडाली. या तरुणाचा शोध प्रशासनासह ग्रामस्थही घेत असून परिसरातील जंगलही शोधून झाल्याची माहिती दापोली प्रशासनाने दिली. बुधवारी रात्रीपासून हा तरुण बेपत्ता झाला आहे. मात्र, अजूनही कुठेही तो आढळून आला नाही. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच डोकेदुखी बनली आहे. संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.