पंढरपूर, 07 एप्रिल : महाराष्ट्राला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. खबरदारी म्हणून राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गर्दी टाळावी म्हणून सर्वच देवस्थान, चर्च, मशिदी बंद ठेवण्यात आले आहे. परंतु, तरीही पंढरपूरच्या विठुरायाची पूजा करण्याचा हट्ट भाजप आमदार आणि सेनेच्या नेत्याला अंगलट आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू आहे, पंढरीतील श्रीविठ्ठल-रुक्मिणीचे दर्शनही बंद आहे. वर्षातील मोठ्या यात्रांपकैकी एक असलेल्या चैत्री यात्रेच्या दिवशी सुद्धा श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर बंद होते. शासनाच्या आदेशाचे पालन करत विठ्ठलाचे भक्त आणि वारकर्यांनीही चैत्री वारीला पांडुरंगाचे नगरीत येणं टाळलं आहे. परंतु 4 एप्रिल रोजी पहाटे उस्मानाबाद येथील भाजपचे आमदार सुजितसिंह मानसिंह ठाकुर आणि श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सदस्य संभाजी शिंदे आणि त्यांच्या पत्नी यांनी श्रीविठ्ठल-रुक्मिणीचे मंदिरात प्रवेश करुन पूजा अर्चा केली.
हेही वाचा - नागपूरमध्ये कोरोनाचा पहिला बळी, तुकाराम मुंढेंसह प्रशासन अलर्ट
कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल सुजितसिंह मानसिंह ठाकुर आणि संभाजी शिंदे यांच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतीची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल बालाजी शिवाजी कदम यांनी दिली आहे.
4 एप्रिल रोजी पहाटे 3:30 ते 5:30 वाजण्याच्या सुमारास सुजितसिंह ठाकूर आणि संभाजी शिंदे यांनी श्रीविठ्ठल रुक्मिणीची पूजा अर्चा करुन संचारबंदी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाचे, साथीचे रोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करुन श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर इथं एकत्र जमून कोरोना विषाणुचा संसर्ग फैलावण्याचा धोका आहे. याची जाणीव असताना सुद्धा सपत्नीक पूजा अर्चा केली. म्हणून पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध भादंवि 269, 270, 188 तसंच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम 51 (ब), 37 (3)/135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -कोरोनामुळे त्यांच्या आयुष्यात आनंद, 7 वर्षांनी भेटला बेपत्ता झालेला मुलगा
यासंदर्भात शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिक माहिती घेतली आहे. अधिक तपास सह पोलीस निरीक्षक करे हे करत आहेत. दरम्यान, या प्रकरणी राष्ट्रवादीकडूनही गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.