पटना, 07 एप्रिल : कोरोनाचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामुळे सध्या असलेलं लॉकडाउन आणखी वाढवलं जाण्याची शक्यता दाट आहे. दरम्यान या कोरोना व्हायरसमुळे 7 वर्षांपुर्वी बेपत्ता झालेली व्यक्ती पुन्हा कुटुंबात परतली आहे. बिहारमध्ये हा प्रकार घडला आहे. भेल्दी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पैगा गावातील ही घटना आहे. पैगा मित्रसेन गावात राहणाऱ्या बाबूलाल दास यांचा मुलगा अजय कुमार उर्फ विवेक दास सात वर्षांपूर्वी अचानक बेपत्ता झाला होता. कुटुंबियानी अजयचा खूप शोध घेतला होता. दोन-तीन वर्षे शोध घेतल्यानंतर त्याचं काही बरं वाईट झालं असेल असं समजून घरच्यांनी शोध थांबवला. पण त्याच्या आई वडिलांचे डोळे मात्र त्याच्या वाटेकडं लागून राहिले होते. तो कधीतरी परत येईल अशी वाटत असलेली त्यांची आशा कोरोना व्हायरसमुळे पुर्ण झाली. उत्तर प्रदेशचे पोलिस एका तरुणाला घेऊन भेल्दी पोलीस ठाण्यात आले. त्याचं नाव अजय कुमार असल्याचं सांगत चौकशी सुरु केली. तेव्हा भेल्दी पोलिसांनी त्याच्या माहितीवरून अजय कुमारला घेऊन पैगा मित्रसेन गाव गाठलं. सकाळी सकाळी पोलीस गावात आल्यानं लोकांमध्ये भीती पसरली. पण बाबुलाल दास यांच्या कुटुंबात मात्र सणाचं वातावऱण झालं. पोलिसांनी सांगितलं की, घरातून बेपत्ता झाल्यानंतर अजय फिरत फिरत उत्तर प्रदेशातल्या बाराबंकी इथं पोहोचला. त्याठिकाणी एका गुन्ह्यात त्याला तुरुंगवास झाला आणि तो शिक्षा भोगत होता. कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने काही कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यात अजय कुमारचाही समावेश आहे. हे वाचा : लॉकडाऊनमध्ये थेट फेसबुकवर दारूच्या जाहिराती, पोलिसांनी नागरिकांना केलं हे आवाहन अजयला उत्तर प्रदेश पोलिसांनी घरी सोडल्यानंतर त्याच्या जामीनावर कुटुंबियांची सही घेतली. त्यानंतर घरी आनंदाचं वातावरण निर्माण झालं. कोरोना आला नसता तर अजय कधीच घरी परतला नसता. कारण त्याची जामिनावर सुटका करणारं बाराबंकी इथं कोणी नव्हतं आणि घरच्या लोकांना त्याची माहिती नव्हती. हे वाचा : पाकमधील भयंकर फोटो आले समोर, कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाच केली अटक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.