दरभंगा, 11 एप्रिल: कोरोना काळात (Coronavirus Pandemic) जीवितहानी, आर्थिक हानी तर झालीच पण त्याचबरोबर आपली असणारी माणसंही एकमेकांपासून दुरावली गेल्याचा प्रकार घडला आहे. पण दुसरीकडे काही परक्यांनी आपलसं केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. बिहारमधी दरभंगा (Darbhanga, Bihar) परिसरातही अशीच काहीशी घटना घडली आहे. कोरोनामुळे वडिलांचा मृत्यू झाला, पण त्यांच्या मुलाने मृतदेह घेण्यास नकार दिला. शेवटी एका मुस्लीम तरुणाने मुलाची भूमिका पार पाडली आणि त्या पित्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. दरभंगामध्ये असणाऱ्या DMCH रुग्णालयाने संबंधित मृत व्यक्तीच्या मुलाला त्यांच्या मृत्यूबद्दल कळवले, पण मुलाने मोबाइलच बंद केला. त्याने कोरोनाच्या भीतीपोटी वडिलांचा मृतदेह घेण्यास नकार दिला. शेवटी कबीर संस्थानने पुढाकार घेतला आणि या व्यक्तीचे अंत्यसंस्कार केले. या संस्थेमध्ये असणाऱ्या एका मुस्लीम तरुणाने हिंदू पद्धतीप्रमाणे या वृद्ध व्यक्तीचे अंत्यसंस्कार केल्याची घटना घडली आहे. मुलाने या निवृत्त वडिलांचा मृतदेह घेऊन जाण्यास असमर्थता दाखवली. त्याने रुग्णालय प्रशासनाला पत्र लिहित याबाबत माहिती दिली. त्यात त्याने असे म्हटले होते की, मृतदेह नेण्यासाठी त्याच्याकडे माणसं नाही आहेत. या पत्रानंतर त्याने फोन बंद ठेवला होता. आज तक ने याबाबत वृत्त दिलं आहे. (हे वाचा- COVID-19 चे भय संपता संपेना! शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविकेचा कोरोनामुळे मृत्यू ) संबंधित मृत व्यक्ती कमतौल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पीडारुच गावातील आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि तीन मुलं असा परिवार आहे. मात्र एक मुलगा सोडल्यास सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह होते. त्याच मुलाने त्यांचा मृतदेह घेण्यास नकार दिला तेव्हा कबीर सेवा संस्थानाला या घटनेची माहिती देण्यात आली. या संस्थेच्या मोहम्मद उमर यांनी एक व्हिडीओ जारी करत अशी माहिती दिली आहे की त्यांनी आता सेल्फ क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून इतर कुणाला याची बाधा होणार नाही. शिवाय त्यांनी असे देखील आवाहन केले आहे की कोरोनाला घाबरण्याची आवश्यकता नाही तर योग्य गाइडलाइनचे पालन करण्याची आवश्यकता आहे. त्यांनी या व्हिडीओतून माहिती दिली आहे की संस्थेतील काही हिंदू लोकांच्या मदतीने त्यांनी त्या वृद्ध व्यक्तीवर अत्यंसंस्कार केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







