मुंबई, 02 सप्टेंबर: विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरातही (Balasaheb Thorat) उपस्थित होते. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागा रिक्त असून अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. याच पार्श्वभूमीवर यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी विनंती राज्यपालांना भेटून करण्यात आली. या भेटीनंतर अजित पवार यांनी माध्यमांना या भेटीसंदर्भातली माहिती दिली आहे. त्यांनी या भेटीदरम्यान कोणकोणत्या विषयावर चर्चा झाल्याचं सांगितलं आहे. अजित पवार म्हणाले, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबतचा ठराव हा कॅबिनेटनं केला होता. मात्र त्यानंतर पुढची कार्यवाही झालेली नाही. म्हणून याबाबत विनंती करण्यासाठी आम्ही आज येथे आलो होतो. त्याबद्दल लवकर निर्णय घेतला तर योग्य होईल, असे सांगून आम्ही राज्यपालांना कार्यवाही करण्याबाबत विनंती केली.
तसंच 12 आमदारांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि स्वाभीमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांची नावे वगळण्यात येतील अशी चर्चा रंगू लागली होती. त्यावरही अजित पवारांनी खुलासा केला आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, एकनाथ खडसे यांची ईडी चौकशी करत आहे. राजू शेट्टी यांच्याविरोधातही एका प्रकरणात गुन्हा दाखल झाला असल्यामुळे राज्यपालांचा या दोन नावांवर आक्षेप असल्याची चर्चा ऐकायला मिळत होती. मात्र, अशा प्रकारची कोणतीही चर्चा झाली नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं.
— Governor of Maharashtra (@maha_governor) September 1, 2021
आम्ही राज्यातील अनेक मुद्द्यांवर चर्चा केली असून आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा केवळ लवकर निर्णय घ्यावा या अनुषगांनं चर्चा केली असल्याचंही ते म्हणालेत. तसंच या भेटीत राज्यातील कोरोनाची स्थिती, पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीबाबत राज्यपालांना माहिती दिली असल्याचंही अजित पवार यांनी सांगितले.