मुंबई, 22 सप्टेंबर : मराठी रंगभूमी, चित्रपट आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या कसदार अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्या निधनामुळे गुणी आणि चतुरस्त्र अशा कलावंताला मुकलो आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आशालता वाबगावकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सातारा येथे 'आई माझी काळुबाई' या मालिकेचं चित्रीकरण सुरू होतं. यादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली. काल त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर अख्ख्या मराठी चित्रपटसृष्टीने हळहळ व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री शोक संदेशात म्हणाले की, 'मराठी कुटुंबातून आलेल्या आशालताजींनी मराठी संगीत रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीत आपले असे स्थान निर्माण केले होते. कवयित्री, गायिका, लेखन अशा क्षेत्रात गती असलेल्या आशालता यांनी अजरामर अशा भूमिका साकारल्या. मराठी आणि हिंदी चित्रपटांतील या भूमिका केवळ त्यांच्यासाठीच असाव्यात इतक्या त्या उत्कृष्ट अभिनेत्री होत्या.'
मराठा आरक्षणासंदर्भात येऊ शकते Good News, राज्य सरकार करणार महत्त्वाची घोषणा
मराठी रंगभुमीही त्यांनी गाजविली. संगीत नाटक आणि व्यावसायिक नाट्यसृष्टीत त्यांचा उत्कृष्ट कलाकार म्हणून दबदबा होता. नव्या होतकरू कलाकारांनाही त्या जवळच्या मार्गदर्शक वाटत. त्यामुळे त्यांनी या पिढीतही जिव्हाळ्याचे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनामुळे आपण गुणी आणि चतुरस्त्र अशा कलावंताला मुकलो आहोत. त्यांचे कला क्षेत्रातील योगदान विसरता येणार नाही, असेच आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना विनम्र श्रद्धांजली.'
ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन, शूटिंगदरम्यान झाला कोरोना
मालिकेच्या चित्रीकरणासाठी मुंबईहून एक डान्सग्रुप आला होता. त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यानंतर तेथील तब्बल 27 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यातच वयाच्या 79 व्या वर्षी आशालता यांची प्राणज्योत मालवली.