चेन्नई, 13 नोव्हेंबर: चेन्नई शहरातील सोकारपेट परिसरात दलीचंद (वय-74), पत्नी पुष्पाबाई (वय-70) आणि मुलगा शीतलचंद (वय-42) यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी चेन्नई पोलिसांनी तीन आरोपींना सोलापुरातून (महाराष्ट्र) अटक केली आहे.
आरोपींमध्ये शीतलचंद्र यांच्या घटस्फोटीत पत्नीच्या भावाचा (मेहुण्याचा ) समावेश आहे. घटस्फोट समझोत्यावरून या तिघांची हत्या झाल्याचं चौकशीत समोर आलं आहे. कैलाश, रवींद्रनाथ आणि विजय अशी आरोपींची नावं आहेत.
हेही वाचा...सॅनिटरी पॅडमध्ये सोनं लपवून तस्करी करीत होत्या 2 महिला; असा लागला सुगावा
चेन्नई पोलिसांनी आरोपींच्या कारचा फिल्मी स्टाईल पाठलाग करून आरोपींना महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात अटक केली. या कारवाईत चेन्नई पोलिसांना सोलापूर आणि पुणे पोलिसांनी सहकार्य केलं. अखेर दलीचंद, पुष्पाबाई आणि त्यांचा मुलगा शीतलचंद्र यांची हत्या कौटुंबिक वादातून झाल्याचं समोर आलं आहे.
काय आहे प्रकरण?
सोकारपेट परिसरात राहणारे दलीचंद (वय-74), पत्नी पुष्पाबाई (वय-70) आणि मुलगा शीतलचंद (वय-42) यांची बुधवारी सायकांळी गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आरोपी पसार झाले होते. पोलीस आरोपींचा कसून शोध घेत होते.
दलीचंद्र यांची मुलगी पिंकी हिने पोलिसांना सांगितलं की, शितलचे मेहुणा विकास आणि कैलास हे पुण्यात राहतात. ते आमच्या कुटुंबाला कायम धमकावत होते. शीतलचंद्र पत्नी जयमाला ही लग्नानंतर पुण्यात निघून गेली होती. नंतर शितलचंद्र आणि जयमालाचा घटस्फोट झाला होता. त्यानंतरही जयमालाचे भाऊ पोटगीसाठी शितलचंद्र याला वारंवार धमकी देत होते.
शीतलचंद यांना येत होत्या धमक्या..
शीतलचंद यांनी आपल्याला अज्ञात नातेवाईकांकडून धमकी मिळत असल्याबाबत पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनी याबाबत चौकशी केली असता कौटुंबिक कारण समोर आलं होतं. याबाबत शीतलचंद यांनी पोलिसांना आधीच माहिती दिली होती. त्यांचा घटस्फोट झाल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.
चेन्नई पोलिसांनी हाच धागा पकडत आरोपीचा माग धरला. चेन्नईचे पोलिस आयुक्त महेशकुमार अग्रवाल यांनी सांगितलं की, या प्रकरणाच्या चौकशीसाठी पाच विशेष तपास पथकं स्थापन करण्यात आली होती. त्या अतिरिक्त आयुक्त, उपायुक्ताचा त्यात समावेश आहे.
हेही वाचा..मोठी बातमी! ऐन दिवाळीत सापडला मोठा शस्त्रसाठा, पुण्यात लादेन टोळीला अटक
पोलिसांना संशय होता की, आरोपी महाराष्ट्र पळून जाऊ शकतात. याबाबत पोलिसांनी आंध्र प्रदेश पोलिसांनाही सतर्क केलं होतं. कर्नाटक आणि महाराष्ट्र पोलिसांची या प्रकरणाच्या चौकशीसाठी मदत घेतली. चेन्नई पोलिसांना मारेकऱ्यांच्या गाडीचा नंबरही मिळाला होता. पोलिसांनी मारेकऱ्यांचा पाठलाग करत सोलापूर जिल्ह्यात त्याच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणात एकूण सहा आरोपी आहेत. यात तीन नातेवाईक आहेत तर तीन त्यांचे मित्र आहेत. इतर आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.