बुलडाणा, 30 मे : बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड (Buldana MLA Sanjay Gaikwad) हे पुन्हा एकदा त्यांच्या हटके स्टाईलमुळं (Style) चर्चेत आले आहे. बुलडाण्यात वादळी वाऱ्यामुळं काही ठिकाणी रस्त्यावर झाडं उन्मळून पडली आहेत. अशाच एका झाडामुळं आमदार संजय गायकवाड यांचा ताफा अडखळला. मग काय आमदारांनी अंगातला शर्ट बाजुला काढून ठेवला आणि स्वतः सगळ्यांच्या मदतीनं रस्त्यातलं ते झाड बाजुला केलं. आमदार संजय गायकवाड यांचा हा बाहुबली अवतार आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
(वाचा-Dombivali पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतींचा धुराळा, कोरोनाचे नियम तुडवले पायदळी)
बुलडाणा जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला पाहायला मिळत आहे. त्यात शनिवारी सायंकाळपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यामध्ये अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडाली तर अनेक घरांचे नुकसान झाले. हवेचा वेग जास्त असल्यानं अनेक झाडं उन्मळून रस्त्यावर पडली आहेत. शेतकऱ्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मतदारसंघात झालेल्या या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार संजय गायकवाड निघाले होते.
(वाचा-मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन प्रकरण; नागपुरातून एकाला अटक)
मतदारसंघात पाहणी करणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांचा ताफा रायरा डाबा या गावाजवळ आला. इथं रस्त्यावर झाड पडलेलं होतं, त्यामुळं रस्ता अडला होता. मग काय आमदारांनी इतर कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना संपर्क करून वेळ न गमावता स्वतः शर्ट काढला आणि सहकाऱ्यांच्या मदतीनं झाड बाजुला केलं. काही महिन्यांपूर्वी राजूर घाटामध्ये भला मोठा दगड रस्त्यावर पडल्यानं अनेक वाहनांना अडथळा निर्माण होत होता. तो दगडही आमदारांनी स्वतः बाजूला केला होता, आणि आज हे झाड बाजूला केल्याने आमदार संजय गायकवाड यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
काही दिवसांपूर्वी आमदार संजय गायकवाड यांनी अंडी, मटण खाण्याबाबत वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यावरून गायकवाड यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. त्या मुद्द्यावरून अनेक आरोप प्रत्यारोपही झाले. त्यावेळीही आमदार गायकवाड चर्चेत आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते यामुळं चर्चेच आले आहेत. पण यावेळी वाद होणार नाही ही चांगली बाब.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Buldhana news, Maharashtra News